कोल्हापूर: कर्नाटकात दुष्काळजन्य परिस्थिती; राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरु

कोल्हापूर: कर्नाटकात दुष्काळजन्य परिस्थिती; राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरु

जमीर पठाण

कुरुंदवाड: कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बंधाऱ्याजवळ 12 फुटाने पाण्याची लेवल करून आजपासून (दि.2) 65 दरवाज्यातील 2 फुटाने बर्गे काढून 1 हजार 200 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सोमवारपासून म्हैशाळ बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्या बंधाऱ्यातून 800 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यातून पाणी मिळावे, अशी मागणी केली होती.
कोयना धरणात सध्या 16.96 टीएमसी पाण्याचा साठा शिल्लक आहे. 2 हजार 100 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वारणा नदीत 10.95 टीएमसी पाण्याचा साठा शिल्लक असून 10.75 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यात कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने औरवाडचा जुना बर्गी-पूल खुला झाला होता. नृसिंहवाडी दत्त मंदिराच्या समोर आणि गौरवाड पाणवठ्याजवळ वाळूचे पात्र खुले होऊन मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. कुरुंदवाडच्या कृष्णा घाटाच्या पायऱ्या देखील खुल्या झाल्या होत्या.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे शेतीत पाणी विसावल्याने शेत पंपाचा पाणी उपसा न झाल्याने नदी तुडुंब भरून राहिली होती. तर राजापूर बंधाऱ्यात 14 फुटाने पाणी अडविल्याने बॅकवॉटरने कोरडी पडलेल्या पंचगंगा नदी नृसिंहवाडी संगमापासून शिरढोण पुलापर्यंत तुडुंब भरली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यासह कर्नाटक राज्याच्या पाण्याची सोय झाली आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्यातील काही गावांबाबतीत माणुसकी दाखवत ऐन कडक उन्हाळ्यात विसर्ग सुरू केला आहे. अशाच पद्धतीने कर्नाटक सरकारनेही महापुराच्या काळात विसर्ग करून माणुसकीचे दर्शन घडवावे, असे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : निश्चित ध्येय, कठोर परिश्रम केल्यास यशस्वी करिअर : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : क्रिकेट असो.च्या अध्यक्षपदी संभाजीराजे
कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन