ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईचा तळीरामांना झटका; शहरात 479 जणांवर कारवाई

ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईचा तळीरामांना झटका; शहरात 479 जणांवर कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍यांविरुद्ध ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रात्री शहरात नाकाबंदी लावून पोलिस ही कारवाई करीत आहेत. पोलिसांच्या करवाईचा तळीरामांनी चांगलाच धसका घेतला आहे. मागील 5 महिन्यात पुणे शहरात ड्रंक अँड ड्राइव्हच्या 479 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
1 जानेवारी ते 20 मे 2024 यादरम्यान पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून 479 जणांवर मद्य प्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 मध्ये 37 जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 मध्ये 562 जणांवर मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.
काय कारवाई होते?
दारू पिऊन वाहन चालवत असताना पकडले गेले, तर प्रथम संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानंतरही दुसर्‍यांदा तीच व्यक्ती मद्य पिऊन वाहन चालविताना पकडली गेली, तर तिच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, वाहन परवाना निलंबित करण्याबाबत पोलिसांकडून आरटीओ प्रशासनाला सांगितले जाऊ शकते.
मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍यांविरोधात वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संपूर्ण शहरात नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे.
– रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त

हेही वाचा

काळजी घ्या! पॅरासिटॅमॉल डोसमध्ये वयानुसार बदल
रेल्वे मेगा ब्लॉक; एसटी, रेल्वे स्थानके गर्दीने फुल्ल..! प्रवाशांच्या रांगा
निमगाव सावा येथे वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद!