एकाच शहराच्या वेगवेगळ्या भागांतील तापमानात का असतो फरक?

एकाच शहराच्या वेगवेगळ्या भागांतील तापमानात का असतो फरक?

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सध्या आगीच्या भट्टीप्रमाणे धगधगत आहे. दिल्लीतील तापमानानं 79 वर्षांचा विक्रम मोडलाय. येथील तापमानानं 52 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय. बुधवारी (29 मे 2024) मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात कमाल तापमान 52.9 तापमान अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. दिल्लीमध्ये आतापर्यंत नोंदवलेलं हे कमाल तापमान आहे. तर, मंगळवारी (28 मे 2024) या ठिकाणी 49.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दिल्लीतील इतर भागात मात्र कमाल तापमान मुंगेशपूरपेक्षा किमान 6 किंवा 7 अंश सेल्सिअसनं कमी नोंदवलं गेलंय. उदाहरणार्थ, बुधवारी (29 मे 2024) राजघाट आणि लोधी रोड येथे कमाल तापमान अनुक्रमे 45.2 आणि 46.2 अंश सेल्सिअस नोदवलं गेलं होतं. आता एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तापमान का नोंदवलेलं जातं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर, आज याबाबतच जाणून घेऊ.
जर दिल्ली शहरातील पीतमपुरा ते राजघाटापर्यंत गाडी चालवली, तर तुम्हाला तुमच्या फोनवर वेगवेगळे तापमान दिसेल. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तापमान मोठ्या प्रमाणावर तेथील हवामानावर आधारित असते, पण विशेषत: दिल्लीसारख्या मोठ्या शहरात तापमान कमी, जास्त असण्यात काही मानवनिर्मित घटकही कारणीभूत असतात. या घटकांमध्ये फुटपाथ, इमारती, रस्ते आणि पार्किंगच्या स्थळांची संख्या आदींचा समावेश होतो. साधारणपणे, कठोर आणि कोरडा पृष्ठभाग कमी सावली आणि आर्द्रता प्रदान करतात. त्यामुळे अशा भागात तापमान वाढते.
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्याचाही तापमान वाढीवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी बहुतांश फुटपाथ आणि इमारती काँक्रिटच्या बनलेल्या आहेत, तेथे तापमान जास्त असते. कारण काँक्रिट हवेच्या समतुल्य प्रमाणापेक्षा सुमारे 2,000 पट जास्त उष्णता शोषून घेते. इमारतींची रचना, दोन इमारतींमधील अंतर हा देखील तापमानावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जर एखाद्या ठिकाण दाट लोकवस्ती असेल, इमारती जवळजवळ असतील, तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात थर्मल द्रव्यमान तयार होतात व ते उष्णता सहजपणे तयार करण्यात अयशस्वी होतात.
अतिशय अरुंद रस्ते आणि उंच इमारती नैसर्गिक हवेच्या प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे तापमान कमी होते. परंतु शॉपिंग मॉल्स आणि निवासी भागात एअर कंडिशनरचा अतिवापर केल्यानं तापमान वाढते. कारण एसी मोठ्या प्रमाणात उष्णता सोडतात. हे सर्व घटक एकत्रितपणे एखाद्या ठिकाणाला ‘अर्बन हीट आयलंड’ करू शकतात. जेथे इतर ठिकाणांच्या तुलनेत जास्त तापमान असते. एखाद्या ठिकाणी वृक्षांचा अभाव असेल, वृक्ष कमी प्रमाणात असतील, जवळपास नैसर्गिक जलस्रोत नसतील, तर असे ठिकाण ‘अर्बन हीट आयलँड’ बनण्याचा धोका जास्त असतो. घनदाट झाडे सावली देतात, व तापमान कमी करतात. वनस्पतींमधून होणारं बाष्पीभवन, जलस्रोतांमधून होणारं बाष्पीभवन थंडावा निर्माण करीत असते. त्यामुळेच मोठी उद्याने आणि शहरी जंगलांच्या आसपासच्या भागात गारवा असतो. याचाच अर्थ जिथे जास्त झाडे आहेत, मोठी उद्याने विकसित झाली आहेत, तिथे तापमान तुलनेनं कमी असते.