‘डिंकी’ लघुग्रहाचे जुळे चंद्र बनले कसे?
वॉशिंग्टन : केवळ ग्रहांनाच चंद्र म्हणजेच नैसर्गिक उपग्रह असतात असे नाही. काही लघुग्रहांभोवतीही असे छोटे चंद्र फिरत असतात. ‘डिंकीनेश’ या लघुग्रहाभोवतीही असे एक नव्हे तर दोन चंद्र फिरतात. या लघुग्रहाला ‘डिंकी’ या नावानेही ओळखले जाते. ‘डिंकी’चे हे जुळे चंद्र संशोधकांच्या कुतुहलाचा विषय बनले होते. आता ‘नासा’च्या ल्युसी यानाद्वारे त्याबाबतची माहिती मिळवण्यात यश आले आहे.
1 नोव्हेंबर 2023 मध्ये डिंकीनेश लघुग्रहाजवळून ‘नासा’चे हे ल्युसी यान गेले. त्यावेळीच अनपेक्षितपणे या लघुग्रहाभोवती हे जुळे चंद्र असल्याचे दिसून आले होते. त्यांना संशोधकांनी ‘सेलम’ हे नाव दिले. आता एका मॉडेलच्या माध्यमातून ‘सेलम’ची निर्मिती कशी झाली हे संशोधकांनी दाखवले आहे. ‘ल्युसी’ हे एखाद्या कारच्या आकाराचे यान आहे. ते 16 ऑक्टोबर 2021 मध्ये सोडण्यात आले होते. त्यावेळी त्याचा उद्देश गुरुचे छुपे लघुग्रह शोधणे हा होता. हे लघुग्रह गुरु ग्रहाच्या मागील बाजूस आहेत.
जानेवारी 2023 मध्ये मुख्य पट्ट्यातील डिंकीनेश किंवा ‘डिंकी’ या लघुग्रहाबाबत माहिती मिळाली. त्यावेळी त्याच्याभोवती एक छोटा चंद्र फिरत असल्यासारखे दिसले; मात्र नंतर त्याच्यापासून 430 किलोमीटर अंतरावरून हे यान गेल्यावर हा एकच चंद्र नसून दोन छोटे-छोटे चंद्र असल्याचे समजले. हे दोन्ही चंद्र एखाद्या सयामी जुळ्यासारखे एकमेकांना चिकटलेले आहेत. ते दोन्ही एकत्रितपणे डिंकीभोवती फिरतात. अशा खगोलांना ‘काँटॅक्ट बायनरीज’ असे म्हटले जाते. सौरमालिकेत ते फारसे आढळत नाहीत; मात्र क्युपर बेल्टसारख्या ठिकाणी ते आढळू शकतात.
आता मेरिलँड युनिव्हर्सिटीतील जेसिका सनशाईन या प्राध्यापिकेने याबाबतचे नवे संशोधन केले आहे. याबाबतची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सेलमला डिंकीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 52.5 तासांचा कालावधी लागतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते तशाच प्रकारे डिंकीवरून सेलमची एकच बाजू दिसते. सेलमचे वजन 2 ते 20 दशलक्ष टन असू शकते. डिंकीपासूनच या चंद्रांची निर्मिती झाली असावी असे संशोधकांना वाटते. ज्यावेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाने डिंकीचा पृष्ठभाग तप्त झाला त्यावेळी डिंकीनेही ही ऊर्जा ‘रि-रेडिएट’ करून उष्णता उत्सर्जित केली. त्याचा परिणाम म्हणून डिंकीवर एक भेग निर्माण होऊन त्याचे दोन जुळलेले तुकडे अंतराळात उडाले व तेच चंद्र बनून डिंकीभोवती फिरू लागले.