राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करा!

राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करा!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात धर्म, भाषा, कला, मूल्यशिक्षणासंदर्भात अमूलाग्र बदलांची गरज आहे. तर आराखड्यात संविधान आणि लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करावी यासाठी 11 आक्षेप नोंदविले असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, आंतर भारती, राष्ट्र सेवा दल आणि शिक्षण हक्क परिषदेचे पदाधिकारी आणि साहित्यिक रामदास फुटाणे व लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत संबंधित पदाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आणि संविधानाप्रमाणे सेक्युलर देश आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात सरकारी धोरण म्हणून धार्मिक शिक्षण असू नये. सर्वधर्म समभावाच्या तत्त्वानुसार सर्वच धर्मातील नैतिक मूल्ये शिकवून विविध धर्म, जाती व पंथाच्या विद्यार्थ्यांमध्ये बंधुता निर्माण करावी, असे शैक्षणिक धोरण असावे. पाठ्यपुस्तके निर्मितीचा प्रमुख उद्देश हा सर्वसमावेशकता, बहुविविधता, प्रबोधन चळवळ व स्वातंत्र्य संग्रामतून सर्वमान्य झालेली पुरोगामी व आधुनिक मूल्ये आणि संविधानिक तत्त्वज्ञानाचे विद्यार्थ्यांवर संस्कार करणे आहे.
पहिली ते बारावीपर्यंत सर्व भाषा माध्यमे व बोर्डाच्या शाळांमध्ये अनिवार्यपणे मराठी व इंग्रजी शिकवली जाणे क्रमप्राप्त आहे. भारतीय ज्ञानप्रणाली अंतर्गत मनाचे श्लोक व भगवतगीतेसोबत वारकरी व भक्तिसंप्रदायाचे संत, जसे की कबीर, रहिम आदी आणि हिंदूसह सर्वच धर्मग्रंथातील नैतिक व प्रेरक विचार यांचा समावेश करून सर्वधर्म समभाव या संविधानाच्या तत्त्वाचे हा उपक्रम राबविताना पालन करावे. आराखड्यात मनुस्मृतीचा उल्लेख क्षम्य नाही. म्हणून हा उल्लेख अंतिम आराखड्यातून वगळावा. कलाशिक्षणाच्या आराखड्यात 64 ललित कलांची यादी दिली असून त्याचा स्रोत वास्यायन यांचे कामशास्त्र नमूद केले आहे. मनुस्मृतीप्रमाणे हा उल्लेख शालेय आराखड्यात करणे अत्यंत अनुचित आहे, म्हणून तो भाग वगळावा.
विज्ञान शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व प्रश्न विचारण्याची संस्कृती निर्माण करणे असला पाहिजे. समाजशास्त्र शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहअनुकंपा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे असले पाहिजे. कला आणि शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी क्रीडांगण आणि क्रीडा साहित्य, तसेच कला शिक्षणासाठी पुरेशी साधनसामुग्री व कला शिक्षकांची उपलब्धता योग्य प्रमाणात असली पाहिजे, असे आक्षेप नोंदविण्यात आले असून विद्या प्राधिकरणाला कळविण्यात येणार आहेत.
संविधान, लैंगिक शिक्षणाचा समावेश करा
मोबाईल संस्कृतीमुळे लहान वयातच मुलांना वाईट पद्धतीने आणि विकृत स्वरूपात लैंगिक ज्ञान अनियंत्रित स्वरूपात मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. परिणामी बाल गुन्हेगारी वाढत चालली आहे. आज जगात अनेक देशात शालेय शिक्षणात लैंगिक ज्ञान दिले जाते. भारतातही ते देणे अत्यंत गरजेचे आहे. आठवी ते बारावीसाठी हे ज्ञान देण्याचा गांभीर्याने विचार करावा. भारतीय संविधान किंवा राज्यघटना ही भारतीय लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान सांगते. त्याचे प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान पाचवी ते बारावीपर्यंत देणे भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जगण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक आहे.
हेही वाचा

रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य; कार्यक्रमावर पोलिसांचा छापा
विकास दराची गरुड झेप; जीडीपी वृद्धी दर 8.2 टक्के
बिल्डरपुत्राच्या चौकशीची पोलिसांना परवानगी; बाल न्याय मंडळाची मान्यता