निवडणूक प्रचारातही पंतप्रधान मोदी राहुल गांधीच्या एक पाऊल पुढे

निवडणूक प्रचारातही पंतप्रधान मोदी राहुल गांधीच्या एक पाऊल पुढे

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी झंझावाती प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मात दिली आहे. पंतप्रधानांनी तब्बल २०६ प्रचारसभा आणि विविध प्रसारमाध्यमांना ८० मुलाखती देऊन प्रचंड ऊर्जा दाखविली आहे. मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी यांनी निम्म्याच प्रचार सभा घेतल्याचे दिसून आले आहे.
निवडणूक प्रचारासाठी मिळालेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत नरेंद्र मोदी यांनी देशभरात २०६ सभा आणि रोड शो केले आहेत. यासोबतच विविध प्रसार माध्यमांना ८० मुलाखती दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी पंजाबमधील होशियारपूरमध्ये शेवटची प्रचारसभा घेतली. काँग्रेसकडून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि प्रियांका गांधी वधेरा स्टार प्रचारक होते. मात्र, या तिघांना मोदी यांची बरोबरी करता आली नाही.
राहुल गांधी यांनी ७६ रोड शो आणि सभा घेतल्या. प्रियांका गांधी वधेरा यांनी २८ सभा आणि १० रोड शो केले. अखिलेश यादव यांनी ५४ सभा घेतल्या, तर मायावतींनी केवळ २१ सभा घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ३१ सभा घेतल्या आहेत.