धुळ्यात भाजपकडून जितेंद्र आव्हाडांच्या फोटोस ‘जोडे मारो’ 

धुळ्यात भाजपकडून जितेंद्र आव्हाडांच्या फोटोस ‘जोडे मारो’ 

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- मनुस्मृति दहन कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असणारे पोस्टर फाडण्याच्या घटनेचे धुळ्यात तीव्र प्रतिसाद पडसाद उमटले आहेत. धुळे शहरात भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. तर शिरपूर शहरात देखील भारतीय जनता पार्टीने संतप्त होत आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेधाच्या घोषणा दिल्या.
धुळे शहरात महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल ,महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. 30) आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येऊन त्यांच्या प्रतिमा असणाऱ्या पोस्टरला काळे फासण्यात आले. यानंतर या पोस्टरला जोडे मारून रोष व्यक्त करण्यात आला.
आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असणारे पोस्टर फाडल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आक्षेपार्ह कृती करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. आता तर त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अवमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलनात प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामण गवळी, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदिप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, सचिन शेवतकर, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, उपाध्यक्ष संजय बोरसे, हेमंत मराठे, आदींसह असंख्य भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिरपूर शहरातही आंदोलन
शिरपुरात धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपुर शहर व तालुका भाजपा तर्फे शहरातील विजयस्तंभा चौकात या ठिकाणी “आ. जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि निवडणुका झाल्यावर त्यांचा फोटो फाडायचा, ही आव्हाडांची कृती निषेधार्य आहे. बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र भूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून विकृत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मानसिकता उघड केली. अशी टीका यावेळी चौधरी यांनी केली. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, तालुका प्रभारी हेमंत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस शामकांत ईशी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा –

घनकचरा व्यवस्थापन करात दुप्पट वाढ : करवाढ रद्द करा; शिवसेनेची मागणी
आव्हाडांकडून झालेली चूक गंभीरच, पण…किरण मानेंची पोस्ट चर्चेत