अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍यास अटक : खामगाव टेकमधील मुलीची सुटका

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍यास अटक : खामगाव टेकमधील मुलीची सुटका

उरुळी कांचन : Bharat Live News Media वृत्तसेवा : खामगाव टेक (ता. हवेली) येथील शेतमजुराच्या मुलीचे दुचाकीवरून अपहरण करणार्‍यास पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. अशोक छगन राजपूत (वय 40, रा. तांबीगोटा वस्ती, मांजरी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून मुलीसह त्याला ताब्यात घेतले. अपहरणकर्ता ऊसतोडणी कामासाठी यापूर्वी खामगाव टेक येथे वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूतने मुलीचे अपहरण करण्याच्या दृष्टीने मुलीच्या कुटुंबीयांशी सलगी केली.
त्यानंतर तिला दुचाकीवरून पळवून नेले. आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. आरोपीबद्दल मिळत नसलेली माहिती व अपहरणकर्त्याच्या दुचाकी क्रमांकात असलेली अस्पष्टता, यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. दुचाकीचे सर्व डिजिटल नंबर प्रत्येक जिल्ह्यातील क्रमांकांशी जोडत पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. आरोपीच्या घरचा पत्ता शोधून काढत पोलिसांनी राजपूतच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्याचा तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी निरीक्षक नारायण देशमुख, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी केला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सहा पथकांची नेमणूक केली होती.
लेकीच्या सुटकेने बापाचे आनंदाश्रू
अपहरण होऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा माग सापडत नसल्याने मुलीचे कुटुंब तणावाखाली होते. उरुळी कांचन पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. त्यामुळे मुलगी मिळेल, अशी आशा या कुटुंबाला होती. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आरोपी गजाआड झाला, अशी भावना मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. मुलगी सुखरूप सापडल्याने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले.
हेही वाचा

आळंदीत आस्थेपुढे व्यवस्था पडतेय कमी : वीज, वाहतूक, पाण्याची समस्या
दुर्दैवी! पळसदेव येथे विषारी साप चावल्याने चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू
येरवडा परिसरात पाण्यासाठी वणवण; तीन दिवसांपासून पुरवठा विस्कळीत