स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवाल गप्प का? : भाजपचा सवाल

स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवाल गप्प का? : भाजपचा सवाल

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : Swati Maliwal | स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल मौन का बाळगुन आहेत असा सवाल भाजपने विचारला आहे. तर स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या विभव कुमारला वाचवण्याचा आपचा प्रयत्न आहे, असाही आरोप भाजपने केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांसह भाजप मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपने केजरीवालांना प्रत्युत्तर देत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावरून आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने भाजप मुख्यालयाला घेरण्याचा प्रयत्न रविवारी केला. त्यानंतर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवालांना धारेवर धरले. “स्वाती मालीवाल यांना ज्या प्रकारे घरी बोलावून मारहाण करण्यात आली. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. इतर गोष्टी करण्यापेक्षा केजरीवाल या प्रकरणी का गप्प आहेत? एवढेच त्यांनी सांगावे,” असे म्हणत केजरीवाल यांच्यावर टीका केली.
याप्रकरणी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इलमी, शहजाद पूनावाला यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली. आम आदमी पक्ष आता आम अपराधी पक्ष झाल्याचा घणाघात शाझिया इलमी यांनी केली. शाझिया इलमी म्हणाल्या की, “विभव कुमारला केजरीवाल संरक्षण देऊ पाहत आहेत. स्वाती मालीवाल दीर्घकाळ आपसोबत आहेत, पक्षाच्या वाढीत त्यांचे सुरुवातीपासून मोठे योगदान आहे. मात्र तरीही स्वाती मालीवाल यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली. गैरवर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय सिंह म्हणाले होते की, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. स्वाती मालीवाल याच्याशी गैरवर्तन करणारे विभव कुमार दिल्लीचे शहाजहा शेख आहेत आणि केजरीवाल त्यांचे सुलतान आहेत,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
शहजाद पूनावाला म्हणाले की, “केजरीवाल यांनी स्वाती मालीवाल प्रकरणावर आपले मौन सोडावे आणि नाटक करण्याऐवजी मूळ प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यांनी विभव कुमारला संरक्षण दिले का? त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज का गायब आहे? एक छोटी क्लिप का प्रसिद्ध झाली आणि पूर्ण व्हिडिओ का नाही?” असे सवाल करत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.