कोकणातील 7 जिल्ह्यांत 613 गावे दरडप्रवण!

कोकणातील 7 जिल्ह्यांत 613 गावे दरडप्रवण!

रायगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत. कोकणातील सात जिल्ह्यांतील 613 गावे दरडप्रवण आहेत. या गावांपैकी 299 गावांचे भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या आजपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील 54 गावे अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत. मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटना पाहता शासनाने यावेळी उपाययोजनांवर अधिक भर देणे गरजेचे आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये दगडांची धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टी होते, तेव्हा पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणार्‍या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते.
कोकणातील रायगड जिल्ह्यात 103 गावे दरडप्रवण असून या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगडमधील 9 गावे अतिधोकादायक, 11 गावे मध्यम धोकादायक व 83 गावे सौम्य धोकादायक श्रेणीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील 36 गावे, तर पालघर जिल्ह्यातील 54 दरडप्रवण आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
मुंबई शहर विभागात 17 गावे अथवा ठिकाणे दरडप्रवण असून या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले आहे. ही 17 गावे मध्यम धोकादायक श्रेणीत आहेत. मुंबई उपनगरमध्ये 57 गावे दरडप्रवण आहेत. या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले असून यातील 40 गावे अतिसंवेदनशिल श्रेणीत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत. येथे 303 गावे दरडप्रवण असून 122 गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 5 गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत, 9 गावे मध्यम धोकादायक, 49 गावे कमी धोकादायक श्रेणीत आहेत. 41 गावे चौथ्या तर 18 गावे धोकादायकच्या पाचव्या श्रेणीत आहेत. उर्वरित 181 गावांच्या सर्वेक्षणासाठी 4 ऑगस्ट 2023 रोजी कळविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 43 गावे दरडप्रवण आहेत. या गावांच्या सर्वेक्षणासाठी 2 ऑगस्ट 2023 रोजी कळविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे किती गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत आहेत. किती कमी धोकादायक श्रेणीत आहेत हे स्पष्ट झालेले नाही.
रायगड जिल्ह्यात 2005 मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये 212 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. ज्यात 84 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून 84 जण दगावले होते. कोकणातील इतर जिल्ह्यातही दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
दरड कोसळण्याची प्रमुख कारणे
संभाव्य दरडग्रस्त गावांचे पुणे येथील जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी दरडप्रवण गावांना भेट देऊन पाहणी केली. डोंगर उतारावरील वृक्ष तोड, बेकायदा खोदकाम, पाण्याचा निचरा होणार्‍या मार्गात अडथळे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभागावरील बांधकाम ही दरड कोसळण्याची प्रमुख कारण आहेत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
या सूचवल्या उपाययोजना…
धोका कमी करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात प्रामुख्याने या परिसरातील खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावे, डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा, पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारवर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत. डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात आणि दरड रोधक भिंतीची उभारणी करण्यात यावी. यापुढे जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी भूवैज्ञानिकांनी सूचविलेल्या या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
दरडप्रवण गावे
मुंबई शहर ः 17
मुंबई उपनगर ः 57
ठाणे ः 36
पालघर ः 54
रायगड ः 103
रत्नागिरी ः 303
सिंधुदुर्ग ः 43
एकूण ः 613