प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल १ जूनपर्यंत जामीनावर बाहेर आले. त्यानंतर अरविंद केजरीवाल भाजपसह एनडीएच्या रस्त्यात अडथळा बनतील आणि दिल्ली, पंजाबसह देशभरात विविध राज्यात केंद्र सरकारवर प्रहार करत प्रचार करतील, अशी अपेक्षा होती. दिल्ली आणि पंजाबमध्ये काही अंशी तसे झालेही. परंतु आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या गैरप्रकाराला भाजपने चांगलेच उचलून धरले आणि अरविंद केजरीवालांसह आपच्या आक्रमक प्रचाराची धार बोथट केली.
स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणावर अद्याप आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा ज्यांच्यासोबत गैरवर्तन झाले त्या स्वाती मालिवाल या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्ती काहीही बोलल्या नाहीत. आपचे खासदार संजय सिंह यांनी मात्र याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी ज्यांनी गैरवर्तन केले त्या विभव कुमार यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने उडी घेतली असून विभव कुमार यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, दिल्ली भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यासह आपविरुद्ध जोरदार निदर्शने करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारमध्ये असताना विविध क्षेत्रात केलेले काम, आम आदमी पक्षाच्या ताब्यात असलेल्या दिल्लीमधील महानगरपालिकांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये केलेले काम यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षाबद्दल चांगली प्रतिमा लोकांच्या मनात आहे. मात्र दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दस्तुरखुद्द अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात जावे लागले. त्यांच्यापूर्वी आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते या प्रकरणात तुरुंगात होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेस काहीसा तडा गेला. हे प्रकरण पूर्ण होत नाही तोच स्वाती मालिवाल यांच्यासोबत झालेले गैरवर्तन प्रकरण चर्चेत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्ष या दोन्ही प्रकरणामुळे गोत्यात येऊ शकतो. केंद्रात सत्ताधारी भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्रमण सुरूच ठेवले आहे. भाजपशासित राज्यांच्या जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे.
विविध चांगल्या कामांनी तयार केलेल्या आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला तडा जात आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी थेट राजकीय मैदानात उतरुन पक्षाच्या उमेदवारांसाठी रोड शो केले, त्यामुळे केजरीवाल स्वतः तुरुंगात असताना पक्षाला ऊर्जा देण्याचे काम त्यांनी केले. आता तर स्वतः केजरीवाल जामिनावर बाहेर आले आहेत.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रचारही सुरू केला. त्याचा परिणामही दिसू लागला. त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपमध्ये काहीशी खळबळ उडाली. केजरीवाल यांनी अलीकडच्या काळात भाषणादरम्यान भाजपवर केलेल्या आरोपांवर भाजपचे सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले. मात्र अचानक स्वाती मालीवाल प्रकरणाने अरविंद केजरीवाल यांना बॅकफूटवर आणले. आधीच दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणावरून आम आदमी पक्षावर जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. ईडीने तर संपूर्ण पक्षालाच यात दोषी मानावे, असे म्हटले. हे प्रकरण आटोपत नाही तर स्वाती मालिवाल प्रकरणी आपची गोची झाली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आम आदमी पक्ष या चक्रव्यूहात अडकला आहे. मात्र लोकांच्या मतानुसार तो किती अडकला आहे हे ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालासह स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
केजरीवाल यांना जामीन देताना विशेष सवलत दिलेली नाही : सुप्रीम कोर्ट
Devendra Fadnavis On Rahul Gandhi | राहुल गांधींची २४ पक्षांची खिचडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कोल्हापुरात अंबाबाईच्या चरणी (Video)