अपर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अजंग ग्रामस्थांचे आंदोलन मागे

अपर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अजंग ग्रामस्थांचे आंदोलन मागे

मालेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- तालुक्यातील अजंग दुर्घटनेतील मृत बालिकेच्या मारेकर्‍यांना त्वरीत अटक करत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी अजंग-वडेल ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.16) गावबंदची हाक दिली होती. यावेळी दोन्ही गावातील व्यापारी प्रतिष्ठाने व अन्य व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते. जो पर्यंत मृत बालिकेला व तिच्या परिवाराला न्याय मिळत नाही. तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी अजंग ग्रामस्थांची चर्चा करीत आठ दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
गावकरी झाले आक्रमक

न्याय मिळत नाही तोवर अंत्यसंस्कार न करण्याचा घेतला होता निर्णय .
गुरुवारी (दि.16) गावबंदची हाक दिली होती.
अपर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अजंग ग्रामस्थांनी अखेर आंदोलन मागे घेतले आहे.

नेमकी घटना काय?
तालुक्यातील चंदनपुरी येथील भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले (वय 8) ही अजंग येथील प्रशांत नगरमध्ये राहणारी तिची आजी निर्मला शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी वास्तव्यास होती. भाविका ही सोमवारी (दि.13) रोजी रात्री बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच दोन दिवसानंतर गावातीलच मोसम नदीकाठी असलेल्या एका विहिरीत बुधवारी (दि.15) रोजी तिचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. भाविकाच्या नातलगांसह ग्रामस्थांनी भाविकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत तिच्या मारेकर्‍यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको केला होता.
गावबंदची दिली होती हाक 
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर संध्याकाळी पोलीसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले. त्यातच अजंग-वडेल ग्रामस्थांनी भाविकाला न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवारी गावबंदची हाक दिली होती. यावेळी दोन्ही गावातील सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. तर काही ग्रामस्थांनी पुन्हा मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको केला. यावेळी ग्रामस्थांनी भाविकाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे. त्याच बरोबर शवविच्छेदन अहवाल त्वरीत कळवावा. आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी केली. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा बूथ गावात लागू देणार नसल्याची भुमिका घेतली. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक भारती यांनी आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकाचे मुळ गाव असलेल्या चंदनपुरी ग्रामस्थांनी देखील मारेकर्‍यांच्या अटकेची मागणी करीत मुंबई आग्रा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला पण तो पोलीसांनी हाणून पाडला.
हेही वाचा –

नाशिक : सभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी चोरटयाने केली लंपास
Nashik News | नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी