निरोगी राहायचय, असा असावा आरोग्यदायी आहार

निरोगी राहायचय, असा असावा आरोग्यदायी आहार

डॉ. संजय गायकवाड

आरोग्यतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या सर्वच अभ्यासकांकडून सातत्याने सांगूनही भारतीयांच्या आहारामध्ये अतिप्रमाणात मीठ असणारे पदार्थ, अतिप्रमाणात साखर असणारे पदार्थ, पॅकबंद पदार्थ यांचे सेवन वाढत चालले आहे. त्यामुळेच मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, कर्करोगासह अन्य अनेक आजार विशी-तिशीतील तरुणांमध्येही दिसून येऊ लागले आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरशी संलग्न असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने (एनआयएन) एका अभ्यासाद्वारे जाहीर केलेल्या माहितीमुळे सबंध देशाची झोप उडाली आहे. एनआयएनच्या मते, जीवनशैलीशी संबंधित निम्म्याहून अधिक म्हणजे 56.4 टक्के आजार हे आहारामुळे होतात. ही माहिती देताना आयसीएमआरने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं भारतात लठ्ठपणाच्या समस्या वाढत असून याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे; अन्यथा भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशारावजा सल्लाही दिला आहे.
यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, बाजारात मिळणार्‍या डबाबंद अन्नपदार्थांवर- खाद्यपदार्थांवर लिहिलेली माहिती दिशाभूल करणारी असू शकते. त्यामुळे त्यांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे. फळांच्या रसाच्या नावाने विकल्या जाणार्‍या पेयात फक्त दहा टक्के फळांचे प्रमाण असू शकते, बाकी साखर असू शकते, हे त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर शुगर फ्री म्हणून विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थ किंवा पेयांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असू शकते.
याखेरीज सध्या ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक, सेंंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी निर्माण झाल्यामुळे त्याचाही फायदा बाजारातील अनेक उत्पादक घेताना दिसतात. यासाठी आपले उत्पादने अनेकदा सेंद्रिय असल्याचा दावा केला जातो; पण बहुतेकदा अशा उत्पादनांना ऑरगॅनिक इंडियाच्या लोकांकडून मान्यता मिळालेली नसते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, उत्पादनामध्ये एक किंवा दोन नैसर्गिक घटक जोडल्याने ते नैसर्गिक होत नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे बॉडीबिल्डिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्रोटिन सप्लिमेंटस्चा वापर हानिकारक असू शकतो, असेही यामध्ये म्हटले आहे.
आयसीएमआर आणि एनआयएनने जाहीर केलेली ही माहिती ग्राहक म्हणून आणि नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. बाजारातील पॅकबंद उत्पादने आणून, त्यांचे सेवन करून आपण आरोग्यदायी आहार सेवन करत आहोत, अशा भ्रमात राहणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या अहवालाने केले आहे.
अर्थात, आयसीएमआरने आरोग्यदायी आहारासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण आयुर्मानासाठी काही सल्लेही दिले आहेत. त्यानुसार नागरिकांनी कमी मीठ खाणे, कमी तेल खाणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच साखर, अति प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके कमी प्रमाणात सेवन करावे, असे म्हटले आहे. तसेच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यवर्धक, पोषणसमृद्ध अन्नपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. संतुलित आहारामध्ये ज्वारी, बाजरी, भरड धान्य आणि कडधान्याचा वापर करणे गरजेचे आहे. काजू, भाज्या, फळे आणि दूध यांचे सेवन करावे.
आज देशातील 5 ते 9 वर्षे वयोगटातील 34 टक्के मुले उच्च ट्रायग्लिसराइडस्ने ग्रस्त आहेत. याचे कारण पोषक घटकांचे कमी सेवन होत आहे. ते सेवन वाढवणे गरजेचे आहे. तसेच डाळी, कडधान्यांचा जास्त वार करावा, असेही हा अहवाल सुचवतो.
याखेरीज चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला आहे. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते, ते आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते; पण जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर लागलीच चहा किंवा कॉफी पिणे बंद करावे, असेही यामध्ये म्हटले आहे.
एकूणच, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने भारतीयांसाठी एकूण 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून, त्यात निरोगी जीवनासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्याची शिफारस केली आहे. वेगाने वाढत चाललेल्या व्याधींच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी या शिफारशींचे अनुकरण करणे नितांत गरजेचे आहे.
हेही वाचा : 

वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली गुणकारी
दम्याविषयी जाणून घ्या, दम्यावर मात करूया!