माजगावात अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

माजगावात अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

अर्जुनवाडा, Bharat Live News Media वृत्तसेवा : माजगाव (ता. राधानगरी) येथील अनिकेत भीमराव कांबळे (वय 25) याचा डोक्यात वार करून खून करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरा राधानगरी पोलिसांत झाली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केली.
अनिकेत कांबळे याला मारुती मधुकर कांबळे (रा. निगवे खा., ता. करवीर) आणि विजय सुरेश कांबळे (रा. माजगाव, ता. राधानगरी) या दोघांनी मंगळवारी रात्री  पार्टी करूया म्हणून बोलावून घेतले. एका शेतात त्यांनी पार्टी केली. विजय कांबळे हा अनिकेत कांबळे याला वारंवार त्रास देत होता. अनैतिक संबंधाच्या संशयातून विजयने अनिकेतला धमकीही दिली होती.
बुधवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह एका शेतात आढळला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक संतोष गोरे व रवींद्र कळमकर यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
अनिकेत हा सेंट्रिंग कामगार होता. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे व यातूनच खुनाची घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राधानगरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मारुती कांबळे व विजय कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. अनिकेत अविवाहित असून, त्याच्यामागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.