‘ब्रेकडाऊन’ थांबणार कधी? सात दिवसांत 349 पीएमपी बस रस्त्यात बंद; प्रवाशांचे हाल

‘ब्रेकडाऊन’ थांबणार कधी? सात दिवसांत 349 पीएमपी बस रस्त्यात बंद; प्रवाशांचे हाल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या सातत्याने ब्रेकडाऊन होत असून, परिणामी प्रवाशांना प्रवासासाठी कसरत करावी लागत आहे. मागील महिन्यात अवघ्या सातच दिवसांत जवळपास 349 बस ब्रेकडाऊन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात 1948 बस आहेत. त्यापैकी 1400 ते 1500 बस मार्गावर असतात. त्यातही दिवसाला सरासरी 50 बस ब्रेकडाऊन होत आहेत. परिणामी, पुणेकर प्रवाशांची प्रवासासाठी मोठी ओढाताण होत आहे. प्रवाशांना बस वेळेत उपलब्ध होत नाही. बससाठी तासन् तास वाट पाहावी लागत आहे. मिळालीच तर ती रस्त्यात बंद पडत आहे. मागील महिन्यात 8 ते 14 एप्रिल 2024 या सात दिवसांमध्ये 349 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
समिती नेमून ब्रेकडाऊनची कारणे शोधा
पीएमपीकडील बसगाड्या सातत्याने ब्रेकडाऊन होत आहेत. दिवसाला सरासरी 50 बस ब्रेकडाऊन होत आहेत. हे रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने त्यांच्याकडील निवृत्त अभियंत्यांची आणि मॅकेनिकल क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, यामुळे ब्रेकडाऊनच्या घटना कमी होतील. अशीच समिती तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी यापूर्वी नेमली होती, त्यामुळे ताफ्यातील बसगाड्यांना आगी लागण्याच्या घटना कमी झाल्या, त्यामुळे पीएमपीने ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी पीएमपी तज्ज्ञांकडून केली जात आहे.

एकूण बससंख्या -1,948
मार्गावरील रोजच्या बस – 1,497
नियोजित फेर्‍या – 20,112
प्रत्यक्ष मार्गावरील फेर्‍या – 17,941
रोजचे प्रवासी – 9,92,818
मासिक प्रवासी – 3,74,27,633

हेही  वाचा

बँकांनी अडवली ऊसतोडणी यंत्रे; अनुदानापासून वंचित राहण्याचा धोका
जळगाव : अमाप झालेले कर्ज फेडण्यासाठी नातवानेच केली आजीची हत्या
काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन : पंतप्रधान मोदी