काँग्रेसकडून धर्माधारित अर्थसंकल्पाच्या विभागणीचा घाट

काँग्रेसकडून धर्माधारित अर्थसंकल्पाच्या विभागणीचा घाट

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
कांदा आणि द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्र शासनाने ” हाती घेतले असून, या माध्यमातून कांदा निर्यातीला चालना देतानाच कांदा निर्यातीसाठी वाहतुकीवर अनुदान तसेच द्राक्ष उत्पादकांसाठी क्लस्टर डेव्हलपेमेंटची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण मुस्लिमांना देऊ पाहणाऱ्या काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाच्या अर्थसंकल्पाचीही विभागणी करण्याचा डाव रचला होता, असा गौप्यस्फोट करत जोपर्यंत या देशाच्या पंतप्रधानपदावर मोदी आहेत तोपर्यंत ना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळेल, ना अर्थसंकल्पाचे विभाजन होईल, असा निर्धारही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही मोदी यांनी जोरदार निशाणा साधला. यापूर्वी काँग्रेस सत्ताकाळात शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हते. केंद्रात महाराष्ट्रातील कृषिमंत्री असूनही शेतकऱ्यांची कुणालाही चिंता नव्हती. काँग्रेस सत्ताकाळात शेतकऱ्यांसाठी खोटे पॅकेज जाहीर केले गेले, अशा शब्दांत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना नाशिकमधील कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावर भाष्य केले. कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी भाजपच्या सत्ताकाळात पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला गेला. यापूर्वी सात लाख मे.टन कांद्याची खरेदी केली गेली. आता पुन्हा पाच लाख मे. टन बफर स्टॉक तयार करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या निर्णयानंतर गेल्या दहा दिवसांतच तब्बल २२ हजार मे. टन कांद्याची निर्यात झाली आहे. ऑपरेशन ग्रीन अतंर्गत कांदा निर्यातीसाठी वाहतुकीवर अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे क्लस्टर डेव्हलपमेंटचा फायदा द्राक्ष शेतकऱ्यांना होईल, असा दावा मोदी यांनी केला.
आपण कधीही धर्माच्या नावावर राजकारण केले नाही. गरिबांना मोफत धान्य, मोफत घर, मोफत वीज कनेक्शन, हर घर जल, उज्ज्वला गॅस अशा कितीतरी योजना राबविताना कधीही लाभार्थ्याचा धर्म बघितला नाही. परंतु, काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्यांचे तुष्टीकरण केले, असे नमूद करत देशाच्या अर्थसंकल्पातील १५ टक्के निधी अल्पसंख्याक अर्थात मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याचा डाव काँग्रेसने रचला होता. धर्माच्या नावावर आरक्षणाचा घाट घालणाऱ्या काँग्रेसने धर्माच्या नावावर अर्थसंकल्पाच्या विभागणीचाही प्रयत्न केला, मात्र विरोधामुळे हा डाव फसला, असे मोदी यांनी सांगितले.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.
नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणारच!
लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणारच आहे. हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. कारण ते नेहमी म्हणत जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी पक्ष बंद करेल. नकली शिवसेनेचा विनाश आता जवळ आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यासाठी हे सारे दु:खदायी आहे. कारण यांनी त्यांच्या स्वप्नाचे पुरते मातेरे केले, अशा शब्दांत मोदींनी उध्दव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारले जावे. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवावे. ते स्वप्न आम्ही पूर्ण केले. परंतु त्याचे सर्वात जास्त दु:ख नकली शिवसेनेला होत आहे. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेसला नकली शिवसेनेने डोक्यावर घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिवसरात्र काँग्रेस शिव्या घालत असतानादेखील नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहे. राज्यातील जनता या लोकांना शिक्षा देणार आहे, असा दावा मोदींनी केला.
काळारामाच्या भूमीत सर्वांना प्रणाम…
‘जय शिवाजी’च्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात करताच अवघे सभास्थळ ‘मोदी..मोदी’च्या घोषणेने दुमदुमून गेले. सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्रीरामचंद्राला नमन करतो, असे नमूद करत काल काशीत बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. आज त्र्यंबकेश्वर, काळारामाच्या भूमीत सर्वांना प्रणाम करतो. तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील ध्येय आहे, असे मोदी म्हणाले.
मोदीजी कांद्यावर बोला!
कांदा फेकीच्या शंकेने धास्तावलेल्या प्रशासनाने सभास्थळी बांधबंदिस्ती करत त्रिस्तरीय तपासणी पध्दत अवलंबिल्यानंतरही केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील कांदा उत्पादकांच्या नाराजीचे पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उमटलेच. उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर मोदींनी काँग्रेसच्या दिशेने टीकास्त्र सोडले. काँग्रेसची सत्ता आल्यास ते अर्थसंकल्पातील १५ टक्के अल्पसंख्याकांसाठी राखून ठेवतील, असे वक्तव्य मोदी यांनी केले. तेवढ्यात एक शेतकरी मध्येच उभा राहिला. ‘मोदीजी कांद्यावर बोला’ अशा घोषणा या शेतकऱ्याने दोन-तीनदा दिल्या. यामुळे सभेत काहीसा गोंधळ उडाला. त्यामुळे मोदी एक क्षण थांबले, समोरून मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. ‘भारतमाता की जय’ या घोषणा देत आपले भाषण पुढे सुरू केले. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सभास्थळावरून बाहेर नेले.
हेही वाचा:

बँकांनी अडवली ऊसतोडणी यंत्रे; अनुदानापासून वंचित राहण्याचा धोका
जळगाव : सहा हजाराच्या लाचप्रकरणी ग्रामसेवकासह शिपाई अटकेत
जळगाव : अमाप झालेले कर्ज फेडण्यासाठी नातवानेच केली आजीची हत्या