निवृत्त मेजरच्या हवेत गोळीबाराने खळबळ! पसुरे, कर्नवडीतील प्रकार
भोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : विजेचे खांब आमच्या जागेतून का नेता, असे विचारल्याने राग अनावर होऊन निवृत्त मेजरने शेतकर्यांच्या समोर बंदुकीतून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. ही धक्कादायक घटना पसुरे, कर्नवडी (ता. भोर) हद्दीतील कुरण गावठाण परिसरात बुधवारी (दि. 15) दुपारी अडीच वाजता घडली. एच. पी. सिंग असे गोळीबार केलेल्या निवृत्त मेजर कर्नलचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त मेजर कर्नल एच. पी. सिंग हे त्यांच्या फार्म हाऊसच्या वीज जोडासाठी पसुरे येथील स्थानिक शेतकर्यांच्या शेतजमिनीतून अतिक्रमण करून विजेचे खांब नेत होते.
त्याबाबतची विचारणा करण्यासाठी बिर्हामणेवाडीतील अशोक गेणबा बिर्हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिर्हामणे, सोनबा कोंडीबा बिर्हामणे, चंद्रकांत कुरुंगावडे व कर्नवडीतील पवार हे शेतकरी गेले. या वेळी एच. पी. सिंग व शेतकरी यांच्यात वादावादी झाली. त्यावर चिडलेल्या सिंग यांनी शेतकर्यांना धमकावित त्यांच्याकडील बंदुकीतून हवेत दोनदा गोळीबार केला. या घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.
आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
निवृत्त मेजर कर्नल एच. पी. सिंग यांच्याकडे परवाना असलेली बंदूक असल्याचे समजते. मात्र, ही बंदूक सिंग यांनी धमकाविण्यासाठी वापरली. लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात शस्त्रास्त्रे नियमानुसार पोलिसांकडे जमा करावी लागतात. परंतु, सिंग यांनी त्यांच्याकडील बंदूक जमा न करता एकप्रकारे आचारसंहितेचा भंग केला असल्याचे संबंधित शेतकर्यांनी सांगितले.
हेही वाचा
लोकसभेच्या आखाड्यातच महापालिकेच्या गटपार्ट्या
कोकणात आठ ठिकाणी साकारणार ‘कोस्टल टाईड पूल टुरिझम’
शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली; शासनाने काढले परिपत्रक