मुंबईत होर्डिंग पडल्याने दिल्लीचे राजकारण तापले

मुंबईत होर्डिंग पडल्याने दिल्लीचे राजकारण तापले

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळामुळे पडलेल्या होर्डिंग्सचा आवाज देशाच्या राजधानीत पोहोचला आहे. आता हे होर्डिंग पडल्याने दिल्लीत राजकारण तापले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याच्या घटनेवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप आघाडी सरकार मुंबईतील लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला घेरले आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याच्या घटनेत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हणले आहे. या भीषण घटनेच्या २४ तासांच्या आत, काही बळी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांच्या ‘शक्ति प्रदर्शना’ला हजेरी लावण्यासाठी वाराणसीला गेले. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका समजते. तर पंतप्रधानपदाच्या नामांकनात हजेरी लावणे जनतेच्या जीवापेक्षा महत्त्वाचा आहे का? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना केला.
घाटकोपरमध्ये पडलेल्या होर्डिंगचे वजन २५० टन असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. हे होर्डिंग रेल्वे मंत्रालयाच्या मालकीच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे लावण्यात आले होते. हे बेकायदेशीर होर्डिंग केंद्र सरकारच्या जमिनीवर होते आणि बीएमसीने परवानगी दिली होती, जी सध्या भाजप-शिंदे सरकारच्या ताब्यात आहे. या संपूर्ण प्रकरणात केंद्र आणि भाजप सरकारने मिळून जनतेच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.