शिंदेंनी स्वतःचे सरकार सांभाळावे : सिद्धरामय्या

शिंदेंनी स्वतःचे सरकार सांभाळावे : सिद्धरामय्या

बंगळूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चे सरकार पहिल्यांदा सांभाळावे, असा टोला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी लगावला.
पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आमच्या आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. अंतर्गत भांडण नाही. बाहेरही भांडण नाही. भांडण असल्यास स्वत:च सरकार कोसळेल. आमच्यामध्ये मतभेद असते तर लोकसभा निवडणुकीत एकत्रित लढत दिली नसती. सोशल मीडियावरील एक्सवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोस्ट टाकली आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे सरकार कोसळणार असे भाकित करणार्‍या शिंदे यांनी स्वत:चे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करणे योग्य होईल, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
शिंदे हे पक्षद्रोही नेते आहेत. त्यांच्या पक्षाची लोकसभा निवडणुकीत धूळदाण उडेल. त्यांचा पराभव निश्चित आहे. ते निराश झाले असून यातून ते वाटेल ते बडबडत आहेत. त्यांचे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही, अशी टीकाही सिद्धरामय्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या विधानाला भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी योग्य उत्तर दिल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. विजयेंद्र यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे म्हटले होते.
राज्यातील भाजपचे काही नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून पिता-पुत्रांच्या समोर अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. त्यांना आरएसएसच्या एका गटाचा आशीर्वाददेखील असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारीपासून वंचित असणार्‍या भाजप नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला नाही. निवडणुकीत बी. एस. येडियुराप्पा आणि मुलांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विजय मिळाल्यास काहीजणांचे पक्षातील महत्त्व कमी होणार आहे. ही भीती भाजपच्या काही नेत्यांना सतावत आहे. यामुळे निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये महास्फोट होईल, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे.
निकालानंतर भाजपमध्ये महास्फोट
कर्नाटकातील भाजप नेत्यांनी आमच्या सरकारची काळजी करण्याचे सोडून स्वपक्षाच्या सरकारची काळजी करावी. आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले अनेकजण नाराज आहेत. निकालानंतर त्याचा स्फोट झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असेही सिद्धरामय्या म्हणाले.