नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा सहभाग

नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा सहभाग

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहभागातून नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून, महापालिकेतील भाजपच्या गत सत्ताकाळात मर्जीतल्या बिल्डरांच्या लाभासाठी बेकायदेशीररीत्या भूसंपादन करून महापालिकेच्या तिजोरीची लूट केली गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकरी असल्याचे दाखवून ठक्कर, मनवानी, शाह या बिल्डरांनी महापालिकेची फसवणूक केल्याचा दावा करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. या प्रकरणात आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला असून, या घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात महापालिकेतील भूसंपादन घोटाळा तापण्याची चिन्हे आहेत.
काय म्हणाले राऊत ?

प्रत्येक व्यवहाराचे आपल्याकडे पुरावे आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय तसेच ईडीला या सर्व व्यवहाराची माहिती दिली आहे
या प्रकरणाची चौकशी व्हावी, एसआयटी स्थापन करावी.

राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला. राऊत म्हणाले की, नाशिक महापालिकेतील भाजपच्या गत सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी कोणी बोलत नाही. मुख्यमंत्री स्वत: भ्रष्टाचाऱ्यांसोबत वॉशिंग मशीन घेऊन फिरत आहेत. अनेक लोक या वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, आता नवीन लोक टाकावे लागतील, असे सांगत नाशिक महापालिकेतील भूसंपादन घोटाळ्याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी भूसंपादन
नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हा लोकांना वाटले होते, नाशिकचा विकास होईल, भरभराट होईल, पण पाच वर्षांच्या भाजपच्या सत्ता काळात विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे लूट केली गेली. शहराच्या विकासासाठी आरक्षित भूसंपादनाची गरज आहे असा भास निर्माण करून, २०२० ते २०२२ या कालावधीत महापालिकेतील सत्तारूढ भाजपने भूसंपादनाचा धडाका लावला. अंदाजपत्रकात भूसंपादनाकरिता जेमतेम १७५ कोटींची तरतूद असताना तत्कालीन नगरविकासमंत्री असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी ८०० कोटींचे भूसंपादन केले गेले. यात महापालिकेतील भाजप पदाधिकारी सामील होते, असा आरोप राऊत यांनी केला.
महसूल विभागाचे कानावर हात
दरम्यान, राऊत यांच्या आरोपात महसूल प्रशासनावरही ताशेरे ओढताना संबंधित यंत्रणेचाही त्यात सहभाग असल्याचे म्हटले आहे. राऊतांच्या या आरोपासंदर्भात महसूल प्रशासनाशी संपर्क साधला असता, मध्यंतरीच्या काळात शहरातील बहुतांश भू-संपादन हे महापालिकेने त्यांच्यास्तरावर वाटाघाटीतून पूर्ण केले आहे. त्यामुळे याबाबत आपल्याकडे अधिक माहिती नसल्याचे सांगत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.
हेही वाचा –

Sourav Ganguly : टी-20 वर्ल्डकपसाठी कोहलीला सलामीवीर म्हणून प्राधान्य द्यावे : सौरव गांगुली
Congress: सुप्रिया भारद्वाज काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक