Loksabha election | घड्याळाच्या टिकटिकसह तुतारीही वाजली..

Loksabha election | घड्याळाच्या टिकटिकसह तुतारीही वाजली..

उरुळी कांचन : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे व त्यापाठोपाठ विधानसभेला अशोक पवार यांना ‘कसं निवडून येतो, ते बघतोच,’ असं खुलं आव्हानं दिल्यामुळे सर्वांत चर्चेत व हॉट सीट झालेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 13) अत्यंत चुरशीने मतदान झाले. या आव्हान व प्रतिआव्हानांमुळे शिरूरच्या निकालाकडेही आता राज्यभराच्या नजरा रोखून बसल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर विधानसभेला जोडलेल्या पूर्व हवेली तालुक्यातूनही या लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान झाले असून, शहरी व ग्रामीण भागात मताधिक्याच्या आकडेवारीने चर्चा सुरू झाली आहे.
अखंड राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप व महायुतीसोबत जाऊन वेगळे बस्तान बसविल्यानंतर त्यांच्या या निर्णयात सहभागी न झालेले खा. अमोल कोल्हे व शिरूर विधानसभेचे आ. अशोक पवार यांना धडा शिकवणार, असे आव्हान दिले आहे. या आव्हानामुळे शिरूर लोकसभेला काय होणार म्हणून बारामतीनंतर शिरूरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच शिरूर विधानसभेला जोडलेल्या हवेलीच्या 40 गावांमध्ये चुरशीने झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची आकडेमोड सुरू झाली आहे.
हवेली तालुक्यातील पुणे-नगर रस्त्याचा भाग व पुणे-सोलापूर रस्त्याचा भाग या मतदारसंघात समाविष्ट होतो. या भागात वाघोली, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, लोणीकंद तसेच थेऊर, कोलवडी, केसनंद व कुंजीरवाडी या प्रमुख गावांचा समावेश होत असल्याने या भागातून मताधिक्य कोणाला मिळणार म्हणून शब्दांचे व पैजांचे खेळ सुरू झाले आहेत. जाणकार विश्लेषकांनी स्थानिक परिस्थिती व राजकीय परिस्थितीच्या आधारे या भागात कोणाचा जोर वाढणार म्हणून तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात घड्याळाचा गजर तसेच प्रदीप कंद यांचा हक्काचा गड असलेल्या भीमा व मुळा-मुठा नदीकाठी असलेल्या गावात घड्याळाचा गजर झाल्याची चर्चा आहे. तर, सोलापूर रस्त्यावरील काही गावांत तुतारी वाजणार असल्याची चिन्हे दिसत असून, काही भागांत घड्याळाने टायमिंग साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे हवेलीत कोणाला मताधिक्य राहणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा

इंडोनेशियातील पूरबळींची संख्‍या ५० वर, २७ बेपत्ता
नाशिक : सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास