Loksabha election | खा. अमोल कोल्हे, आ. बेनके यांनी केले मतदान

Loksabha election | खा. अमोल कोल्हे, आ. बेनके यांनी केले मतदान

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथील 268 व्या मतदान केंद्रामध्ये आपली पत्नी,आई व इतर नातेवाइकांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीदेखील आपली आई, पत्नी, भाऊ, भावजय यांच्यासमवेत 270 व्या मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला. नारायणगाव परिसरामध्ये शांततेत मतदान झाले. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास अनुमती नसल्यामुळे मतदारांची मोठी तारांबळ उडाली.
मतदान करण्यासाठी लागणारे पुरावे हे मोबाईल मध्ये फोटो काढून ठेवलेले असतात. सध्या डिजिटलचा जमाना असताना प्रशासनाने ऐनवेळी मोबाईल मतदान केंद्रास न नेण्याचा फतवा काढल्याने मतदारांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वारूळवाडीच्या मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदार यादीमध्ये काही मतदारांची नाव नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या मतदारांना मतदान केंद्रापासून माघारी जावे लागले.
दरम्यान, दुपारी पाचच्या सुमारास काही परिसरामध्ये पाऊस झाल्याने मतदान प्रक्रियेवर काहीसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. तथापि काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाही होत्या. सकाळी सात वाजता दोन्ही आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदान केंद्राजवळ शंभर फुटाच्या बाहेर बूथ लावले होते. मतदाराला मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून या बुथचादेखील फायदा झाला.आपल्याच उमेदवाराला सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी कार्यकर्ते झटताना पाहायला मिळाले.
दरम्यान, आमच्याच उमेदवाराला सर्वाधिक मतदान मिळाले असून, 4 जूनला आमचा विजय झालेला पाहायला मिळेल अशा प्रकारची चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली. तथापि उन्हाचा तडाखा जास्त असल्याने मतदान करायला लोक बाहेर यायला कानकूस करत होते. त्यामुळे मतदानाचा टक्कादेखील घसरला आहे. झालेल्या मतदानापैकी आमच्याच उमेदवारांनी बाजी मारली असून, काही कार्यकर्त्यांनी पैजादेखील लावल्याचे समजते. आता मतदान झालंय 4 जूनला मतमोजणी आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांची अशीच मताधिक्य आमच्याच उमेदवाराला झाल्याची चढाओढ पाहायला मिळू शकते. दरम्यान, मतदान केंद्र परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या नेतृत्वाखाली नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार व त्यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा

Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास
नाशिक : सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
नाशिक : पाणीटंचाईने वैतागल्या अन् ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत महिलांनी मांडला ठिय्या