राजगडसह प. हवेलीला पावसाचा तडाखा; उन्हाळी पिके, वीटभट्ट्यांचे नुकसान

राजगडसह प. हवेलीला पावसाचा तडाखा; उन्हाळी पिके, वीटभट्ट्यांचे नुकसान

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राजगड (वेल्हे) तालुक्यासह सिंहगड, पश्चिम हवेलीत सोमवारी ( दि.13) सायंकाळी विजेच्या कडकटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे पानशेत, खानापूर, वेल्हे भागातील बहुतांश गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. लागोपाठच्या अवकाळी पावसामुळे हातात तोंडाशी आलेला आंबा तसेच उन्हाळी पिके वाया गेली आहेत. तसेच वीटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे वेल्हे, पानशेत येथील बाजारपेठांमध्ये पाणी शिरले. पुणे-पानशेत, वेल्हे -नसरापूर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दुपारी चारच्या सुमारास राजगड, तोरणागडाच्या परिसरात विजेच्या कडकटासह जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात पानशेत, कादवे, रुळे, निगडे, मोसे, ओसाडे, सिंहगड भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत धो- धो पाऊस कोसळत होता. पानशेत, कुरण खुर्द, कुरण बुद्रुक, जांभली, सोनापूर, रुळे परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले.
जोरदार वार्‍यामुळे चिकू, पपई, आंबा आदी फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. चांगला बाजारभाव मिळत असताना भाजीपाला पिके जमिनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची पाहणी करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी.
– रवींद्र कडू, कुरण बुद्रुक.
मुसळधार पावसामुळे आंबा जवळपास पूर्णपणे वाया गेला आहे. जनावरांचा चारा, भाजीपाला पिके जमिनदोस्त झाली आहेत.
-विनोद दिघे, वेल्हे खुर्द.

हेही वाचा

Nashik | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आजपासून मतदान
बिबवेवाडीतील खेळाच्या मैदानांची दुरवस्था; महापालिका प्रशासन सुस्त
दुपारनंतर मतदारराजाची केंद्रांवर गर्दी; सायंकाळी केंद्रांबाहेर रांगा