‘या’ विधानसभा मतदारसंघातील मतांची गोळाबेरीज काय सांगतेय?

‘या’ विधानसभा मतदारसंघातील मतांची गोळाबेरीज काय सांगतेय?

पिंपरी विधानसभा मतदारसंघ
पिंपरी : मावळ लोकसभाअंतर्गत मतदारसंख्येनुसार तिसर्‍या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 42.2 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या मतदारसंघात दोघांपैकी कोणता उमेदवार मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरतो त्यावर बर्‍याच अंशी विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा निवडणुकीत आमनेसामने आहेत. वाघेरे यांचे मतदान पिंपरी विधानसभाअंतर्गत येते. तर, बारणे यांचे मतदान चिंचवड विधानसभाअंतर्गत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मावळच्या जागेसाठी दावा करण्यात आला होता. मात्र, ही जागा शिवसेनेसाठी सोडण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी बारणे यांच्या प्रचारात सामील झाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
सांगवी ते किवळेपर्यंत विस्तारलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मतदानाच्या दिवशी या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. जास्त मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली.
या मतदारसंघात अश्विनी जगताप या आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव केला; मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे अजित पवारांसोबत नाना काटे हेदेखील महायुतीत सहभागी झाले आहेत. याच विधानसभेतील रहिवासी असलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना (शिंदे गट) तसेच, आरपीआयचे कार्यकर्ते मतदान वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत होते. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, आप, शेकाप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मतदान वाढीसाठी प्रयत्न करताना दिसले.
भोसरी विधानसभा मतदारसंघ
भोसरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. या दोन्ही उमेदवारांच्या तुतारी व घड्याळ चिन्हावर मतदानासाठी दोन्हीकडील पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसभर झटत होते. मतदारसंघात 5 लाख 51 हजार 582 मतदार आहेत. मतदारसंघात भोसरी, एमआयडीसी, गवळीमाथा, इंद्रायणीनगर, चर्‍होली, वडमुखवाडी, डुडुळगाव, म्हेत्रे वस्ती, मोशी, चिखली, जाधववाडी, रूपीनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, तळवडे, निगडी या भागांचा समावेश आहे. महेश लांडगे हे आमदार असल्याने मतदारसंघात साहजिकच भाजपाची ताकद आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघ
वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने श्रीरंग बारणे व संजोग वाघेरे यांच्यात झालेल्या सरळ लढतीत मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला. मावळात वाघेरे यांची पेटलेली मशाल बारणेंचा धनुष्यबाण रोखणार की, बारणेंचा धनुष्यबाण वाघेरे यांची मशाल विझवणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. वाघेरे यांच्या मशालीवरच मावळ विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे भविष्य अवलंबून आहे.
आधी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध नंतर केला प्रचार
निवडणुकीच्या तोंडावरच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर निशाणा साधत आधी दहा वर्षांत काय काम केले, याचा हिशोब द्या व मग उमेदवारी मागा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनीही आम्ही किती वेळा त्यांचे काम करायचे, असा सवाल करत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता; परंतु स्थानिक विरोध असताना बारणे यांची उमेदवारी महायुती नेत्यांनी जाहीर केली आणि शेळके व भेगडे या दोघांनी आपापल्या तलवारी लगेच म्यान करत तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मूठ एकत्र बांधण्यास सुरुवात केली. नेत्यांचा आदेश मानून सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा, असे आवाहन करत या दोन्ही नेत्यांनी बारणे यांचा प्रचार सुरू केला. त्याचा फायदा त्यांना झाला.
हेही वाचा

बिबवेवाडीतील खेळाच्या मैदानांची दुरवस्था; महापालिका प्रशासन सुस्त
लोकशाहीसाठी तरुण जर्मनीहून थेट पुण्यात; बजावला मतदानाचा हक्क
Loksabha election | पुुणेकरांच्या मताचा वाढीव टक्का, कुणाच्या पारड्यात जाणार?