तडका : सब कुछ फ्री

तडका : सब कुछ फ्री

काही लोकांना सतत काही ना काहीतरी फ्री मिळावे असे वाटत असते. अर्थात, त्यात काही चूक नाही. याच्यावर ते फ्री, त्याच्यावर हे फ्री, एकावर तीन फ्री, चारावर दहा फ्री याची लोकांना मार्केटने सवय लागली आहे. परदेशातही असाच प्रकार आहे आणि तो तिकडूनच आपल्याकडे आला आहे. फ्री किंवा फुकट या शब्दाचे फार मोठे आकर्षण भारतीय लोकांना आणि विशेषत: आपण मराठी लोकांना असते. याच कारणामुळे पावसाळी सेल किंवा भरपूर डिस्काऊंट दिलेल्या वस्तू खरेदी करताना लोकांना समाधान मिळत असते.
पहिले समाधान म्हणजे मिळणार्‍या वस्तू आपण त्यांच्या मूळ भावापेक्षा कमी दरात खरेदी केली आहे, हे असते आणि दुसरे समाधान म्हणजे आपण काटकसरीने खरेदी करत असतो किंवा चाणाक्षपणे खरेदी करत असतो, ही भावना हे असते. सकाळच्या वेळी रस्त्यावर बसून भाजी विकणारे संध्याकाळच्या वेळेला बर्‍यापैकी कंटाळलेले असतात आणि त्यांचा थोडा काही माल उरलेला असतो. नेमके याचवेळी भाज्या खरेदीसाठी बाहेर पडणारे महाभाग काही कमी नाहीत. फ्लॅट बुकिंगवर दहा ग्रॅम सोन्याचे नाणे फ्री किंवा लिक्विड हँडवॉश घेतले तर त्याबरोबर त्याच कंपनीचा साबण फ्री असे फंडे विक्रेते मंडळी राबवत असतात.
राजकारणाचाही बाजार झाल्यामुळे निवडून द्याल तर पुढील पाच वर्षे अमुक फ्री आणि तमुक फ्री, अशा घोषणा सर्रास दिल्या जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री यात एक तरबेज असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आधी दिल्लीवासीयांना इलेक्ट्रिसिटी फ्री, पाणी फ्री, उपचार फ्री अशा घोषणा देऊन स्वतःची सत्ता आणली आणि असाच काहीसा प्रयोग पंजाबमध्ये करून दाखवला.
श्रीमान दिल्लीचे मुख्यमंत्री हे बाहेर पडले, तेव्हा जल्लोष साजरा करतच बाहेर पडले. तीही आजकाल फॅशनच झाली आहे. त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते बँड घेऊन जेलच्या दारात जातात आणि जल्लोषात मिरवणुका काढत नेत्याच्या काही काळच्या सुटकेसाठी आनंद व्यक्त करतात, हे सर्व आपल्यालाही वळणाचे झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री जेलमधून फ्री होऊन बाहेर पडल्याबरोबर काही तासांत सक्रिय झाले आणि त्यांनी वाटेल त्या घोषणा करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये सहा खासदार आहेत आणि पंजाबमध्ये दहा खासदार आहेत. म्हणजे यांचा पक्ष 50 टक्के जागांवर निवडून आला तरी दिल्लीच्या तीन आणि पंजाबच्या पाच अशा एकूण आठ जागा निवडून आल्या असे गृहीत धरले तरी तेवढ्या जोरावर देशाला काय-काय फ्री देता येईल, याच्या घोषणा करायला त्यांनी सुरुवात केली.
आपल्या पक्षाला निवडून दिले तर संपूर्ण देशामध्ये वीज फ्री, पाणीपुरी फ्री… माफ करा, पाणी फ्री, उपचार फ्री, शिक्षण फ्री करून टाकू, अशा त्यांनी घोषणा करून टाकल्या. याशिवाय अल्प दरात धान्य बहुतांश जनतेला निळत आहे. म्हणजे एकदा या पक्षाचे खासदार आपण निवडून दिले तर भारतातील तमाम जनतेला काही करण्याची गरजच पडणार नाही. रामराज्य- रामराज्य म्हणतात ते हेच की काय, असा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडेल. घर फ्री मिळणार, त्यासाठी वीज फ्री मिळणार, पाणी फ्री मिळणार, तुम्ही मुलांना जन्म दिला तर त्यांना औषधोपचार फ्री मिळणार, पुढे चालून मुलांना शिक्षण फ्री मिळणार… मग तुम्हाला काही करायची गरजच भासणार नाही, असे चित्र त्यांनी उभे केले आहे.pudhari