सेन्सेक्स- निफ्टीमध्ये घट, बाजारावर कशाचा परिणाम?

सेन्सेक्स- निफ्टीमध्ये घट, बाजारावर कशाचा परिणाम?

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 420.65 अंक व 1213.68 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 22055.2 अंक तसेच 72664.47 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.87 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घट नोंदवली गेली. एकूण सप्ताहभरात दोन्ही निर्देशांकांनी घट दर्शवली असली तरीदेखील शुक्रवारच्या अखेरच्या सत्रात निफ्टीमध्ये 0.44 टक्के व सेन्सेक्समध्ये 0.36 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये हिरो मोटोकॉर्प (7.1 टक्के), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (6.8 टक्के), एचयूएल (6.6 टक्के), कोटक महिंद्रा बँक (5.3 टक्के), टाटा मोटर्स(3.3 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला तसेच सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स (-9.4 टक्के), टायटन (-6.9 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (-6.8 टक्के), अदानी एन्टरप्राईस (-6.6 टक्के), लार्सन अँड ट्रुबो (-6.5 टक्के) या समभागांचा समावेश झाला. बहुतांश मोठ्या सरकारी बँका जसे की एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा यांसारख्यांचे गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल या सप्ताहात जाहीर झाले. याचादेखील परिणाम निर्देशांकावर झाला.
देशाच्या औद्योगिक उत्पादनाचे निदर्शक असलेला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन (आयआयपी) मार्च महिन्यात 4.9 टक्क्यांपर्यंत खाली आला. फेब्रुवारी महिन्यात आयआयपी निर्देशांक 5.6 टक्के होता. या निर्देशांकाचे प्रमुख तीन घटक म्हणजे विद्युतनिर्मिती क्षेत्र 8.7 टक्के निर्मिती/ (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्र (5.2 टक्के), तर खाणकाम उद्योग क्षेत्र 1.2 टक्के वधारले.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा तब्बल 24 टक्के वधारून 20698 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 3 टक्के वधारून 41655 कोटी झाले. तसेच इतर उत्पन्न 24 टक्के वाढून 17,369 कोटी झाले. नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम) 0.3 टक्के घटून 3.30 टक्क्यांवर आले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 2.78 टक्क्यांवरून 2.24 टक्के, तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 0.67 टक्क्यांवरून 0.57 टक्के झाले. अनुत्पादित कर्जे तसेच इतर कारणांसाठी केल्या जाणार्‍या तरतुदींमध्येदेखील घट होऊन (प्रोव्हिजन्स) या तरतुदींचे प्रमाण 3315 कोटींवरून 1609 कोटींपर्यंत खाली आले.
देशातील आरोग्य विम्यावर आकारला जाणारा 18 टक्के जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत खाली आणला जाण्याची शक्यता. 30 हजारपर्यंत प्रीमियम असणार्‍या आरोग्य विम्यावर 12 टक्के जीएसटी आकारला जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकांनंतर होणार्‍या जीएसटी समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे समजते. संसदेच्या अर्थविषयक समितीचे प्रमुख खासदार जयंत सिन्हा यांनी हेल्थ आणि टर्म इन्श्युरन्सवरील जीएसटी घटवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
देशातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदाचा मार्च तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 2.3 टक्के वधारून 4775 कोटींवरून 4886 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 2 टक्के वधारून 11793 कोटी झाले, तसेच नेट इंटरेस्ट मार्जिन 3.5 टक्क्यांवरून 3.27 टक्के झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 3.79 टक्क्यांवरून 2.92 टक्क्यांपर्यंत खाली आले.
एप्रिल महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या गुंतवणुकीने नवा विक्रम केला. एसआयपीच्या माध्यमातून भांडवल बाजारात एकाच महिन्यात तब्बल 20372 कोटी गुंतवण्यात आले. म्युच्युअल फंडातील इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीचा ओघ मात्र 16.4 टक्के घटून 18917 कोटींपर्यंत खाली आला. म्युच्युअल फंडाचे एकूण व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य 7.2 टक्के वधारून 57.25 लाख कोटींवर पोहोचले. एप्रिल महिन्यात 63.6 लाख नवीन एसआयपी सुरू करण्यात आले, तसेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्यात आलेले भांडवल बाजारमूल्य 11.26 लाख कोटींवर पोहोचले.
देशातील खनिज तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपनी बीपीसीएलचा निव्वळ नफा 30.3 टक्के घटून 6870 कोटींवरून 4789 कोटी झाला. कंपनीचे एकूण उत्पन्न 1 टक्का घटून 1 लाख 34 हजार कोटींवरून 1 लाख 33 हजार कोटी झाले. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 7.02 टक्क्यांवरून 4.74 टक्क्यांपर्यंत खाली आले. याच क्षेत्रात कार्यरत असणारी दुसरी सरकारी कंपनी एचपीसीएलचा निव्वळ नफा 25 टक्के घटून 3608 कोटींवरून 2709 कोटी झाला. कंपनीचा महसूल 6 टक्के वधारून 1 लाख 35 हजार कोटींवरून 1 लाख 20 हजार कोटी झाला. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 4.08 टक्क्यांवरून 2.79 टक्क्यांपर्यंत आले.
सरकारी बँक पीएनबीचा गतआर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तिप्पट होऊन 1159 कोटींवरून 3010 कोटींवर पोहोचला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 9.1 टक्के वधारून 9499 कोटींवरून 10363 कोटी झाले. अनुत्पादित कर्जासाठी करण्यात येणार्‍या तरतुदींमध्ये (र्झीेींळीळेपी) घट होऊन तरतुदी 3625 कोटींवरून 1958 कोटीपर्यंत खाली आल्या. त्याचप्रमाणे एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 8.74 टक्क्यांवरून 5.73 टक्क्यांपर्यंत खाली आले. तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण नेट एनपीए 0.96 टक्क्यांवरून 0.73 टक्क्यांवर आले.
इंग्लंडची मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंडने देशातील व्याजदर 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. व्याजदर निश्चिती करणार्‍या समिने सलग सहाव्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. समितीच्या 9 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला. यासंदर्भात पुढील बैठक 20 जून रोजी होणार आहे. इंग्लंडमधील व्याजदर हे मागील 16 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यापुढील बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता अर्थविश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
देशातील सर्वात मोठी रंग उत्पादक कंपनी एशियन पेंटचा मार्च तिमाहीचा निव्वळ नफा 1.8 टक्के वधारून 1256 कोटी झाला. महसूल 8731 कोटी झाला.
भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सला 31 मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 17529 कोटींचा नफा झाला. नफ्यात तब्बल तिप्पट म्हणजेच 219 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा महसूलदेखील 14 टक्के वधारून 1 लाख 19 हजार कोटींवर पोहोचला. प्रामुख्याने यामध्ये टाटा मोटर्सची उपकंपनी जॅग्वार लँडरोव्हरने नेत्रदीपक कामगिरी केली. या उपकंपनीने तिमाहीत 1.4 अब्ज पौंडांचा नफा कमावला.
गोडिजिट जनरल इन्श्युरन्स कंपनीचा आयपीओ 15 मे ते 17 मे दरम्यान खुला होणार. या आयपीओचा किंमत पट्टा 258 ते 272 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. एकूण 2615 कोटींचा निधी उभारणीचे कंपनीचे लक्ष्य आहे. कॅनडास्थित फेअर फॅक्स समूहाचे प्रेम वत्सा या कंपनीचे प्रवर्तक आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हेदेखील गोडिजिट कंपनीमधील एक प्रमुख गुंतवणूकदार आहेत.
एचडीएफसी बँकेतर्फे ग्रामीण भागातील स्टार्ट अप्ससाठी परिवर्तन या उपक्रमाची घोषणा. यासाठी 19.6 कोटींचा निधी निश्चित करण्यात आला असून, अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग यांसारख्या सरकारी उपक्रमांशी व संस्थांशी भागीदारी करण्यात आली आहे. सामाजिक उन्नती आणि प्रगती क्षेत्रात कार्यरत असणार्‍या स्टार्टअप्सना निधी या उपक्रमाद्वारे पुरवला जातो. 2017 साली सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे आजपर्यंत 400 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना मदत करण्यात आली आहे.
3 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 3.7 अब्ज डॉलर्सनी वधारून 641.59 अब्ज डॉलर्स झाली. मागील चार सप्ताहात प्रथमच गंगाजळीत वाढ नोंदवली गेली.
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)
हेही वाचा : 

शेअर बाजारात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, फायदे काय?
घरभाडे घेताय? टीडीएसविषयी माहीत आहे?
गृहकर्ज अगोदरच फेडावे की गुंतवणूक सुरू ठेवावी?