फोडाफोडीचे राजकारण शरद पवारांनी सुरू केले : राज ठाकरे
ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनीच शिवसेना फोडून सुरुवात केली. छगन भुजबळ यांना शिवसेनेतून त्यांनी फोडले, त्याच भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील पारसिक नगर येथे रविवारी केली.
शरद पवार यांच्यापासूनच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात
भुजबळांकडून बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न
प्रचार सभेत सुषमा अंधारेंच्या भाषणाची क्लिप
ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबरोबरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार यांनी काँग्रेस सोडून पुलोद स्थापन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पुढे छगन भुजबळ यांना घेऊन शिवसेना फोडली.
मी पहिली निवडणूक बघतोय की, या लोकसभा निवडणुकीला विषयच नाही. आज विषयच नसल्याने आई-बहिणीवरून उद्धार केला जात असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत विषय काय तर वडील चोरले. फोडाफोडीचे राजकारण मला कधीही मान्य नाही. मात्र याच उद्धव यांनी खोके देऊन आमचे नगरसेवक घेतले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी प्रचारात म्हणाले होते की, आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. अमित शहा म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री. मग निवडणुका झाल्यावर निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर आक्षेप का घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंब्र्यातील अतिरेकी कनेक्शनवर भाष्य
आज जे मी सांगत आहे ते फक्त मुंब्राबद्दल आहे. संसदेवर जो हल्ला झाला, त्याचा आरोपी मुंब्रामध्ये सापडला. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी मुंब्र्यात अटक. 2017 मध्ये एटीएसने मुंबईतून चारजणांना अटक केली. हे सगळं आपल्या उजव्या बाजूला असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
प्रचार सभेत सुषमा अंधारेंच्या भाषणाची क्लिप
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या बाई काय म्हणाल्या, 85 वर्षांच्या म्हातार्याच्या हातात तलवार दिली, असं म्हणणार्या या बाईला तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या करता आणि उपनेत्या बनवता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.