कोल्हापूर : कासारी धरणात ३४ टक्के पाणीसाठा 

कोल्हापूर : कासारी धरणात ३४ टक्के पाणीसाठा 

सुभाष पाटील

विशाळगड :  गेळवडे येथील कासारी मध्यम प्रकल्पात मृतसाठा वगळून ०.९५ टीएमसी म्हणजे ३४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कासारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. प्रखर ऊष्णतेमुळे नदी, नाले, ओढे जलसाठा आठू लागल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीपात्रातील पाण्यावर उपसाबंदी नाही. जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन धरण प्रशासनाने केले असले तरी पाऊस लांबल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
कासारीची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. गतवर्षी याचदिवशी धरणात ०.७५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा गतवर्षीपेक्षा ७ टक्के पाणीसाठा अधिक आहे. उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. धरण बांधणीपासून आतापर्यंत पाण्याबरोबर आलेला गाळही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्केपेक्षा नक्कीच कमी असणार आहे. पाऊस लांबल्यास पुढील काळात निश्चितच पिकांना पाण्याची कमतरता भासणार आहे. कासारी धरण दोन तालुक्यातील गावांना वरदान ठरत आहे. येथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी धरण १०० टक्के भरते.
कडवी धरणात सर्वाधिक पाणीसाठा
 तालुक्यातील कडवी व कासारी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत पैकी कडवी धरणात मे च्या मध्यावर ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील धरणांपैकी सर्वाधिक शिल्लक पाणीसाठा कडवी धरणात आहे. आजमितीला धरणात उपयुक्त पाणीसाठा १.२५ टीएमसी म्हणजे ५० टक्के आहे. त्याखालोखाल कुंभी धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे.
पाणीसाठ्यात तफावत
यंदाचा आणि गेल्यावर्षी ११ मेचा कंसातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये धरणनिहाय असा : राधानगरी २.१० (२.३६) , तुळशी १.३३ (१.२५), वारणा ६.२४ (१०.२०), दुधगंगा ३.६६ (२.९८), कासारी ०.९५ (०.७५), कडवी १.२५ (१.०४), कुंभी १.३२ (१.२४), पाटगाव १.३७ (१.०७).
हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वळवाचा तडाखा : सहा जखमी
कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या युवकाचा कासारी धरणात बुडून मृत्यू
कोल्हापूर विमानतळ जगाच्या हवाई नकाशावर