दम्याविषयी जाणून घ्या, दम्यावर मात करूया!

दम्यावर तुम्ही मात करू शकता. दम्यासाठी जी उपचार पद्धती आहे, त्यामध्ये तोंडाद्वारे घ्यायची औषधे जशी आहेत, तशीच श्वासावाटे घ्यायची औषधे असतात. ही औषधे अत्यंत उपयुक्तअसतात. डोळ्यांच्या आजारासाठी आपण जसे डोळ्यात थेंब टाकतो, त्वचेच्या विकारासाठी आपण त्वचेवर मलम लावतो, त्याच पद्धतीने श्वसन मार्गात सोडण्यासाठी जी औषधे पंपावाटे म्हणजे इन्हेलरद्वारे, रोटाहेलरद्वारे दिली जातात ती श्वासनलिकांवर परिणाम करून …

दम्याविषयी जाणून घ्या, दम्यावर मात करूया!

डॉ. अनिल न. मडके

दम्यावर तुम्ही मात करू शकता. दम्यासाठी जी उपचार पद्धती आहे, त्यामध्ये तोंडाद्वारे घ्यायची औषधे जशी आहेत, तशीच श्वासावाटे घ्यायची औषधे असतात. ही औषधे अत्यंत उपयुक्तअसतात. डोळ्यांच्या आजारासाठी आपण जसे डोळ्यात थेंब टाकतो, त्वचेच्या विकारासाठी आपण त्वचेवर मलम लावतो, त्याच पद्धतीने श्वसन मार्गात सोडण्यासाठी जी औषधे पंपावाटे म्हणजे इन्हेलरद्वारे, रोटाहेलरद्वारे दिली जातात ती श्वासनलिकांवर परिणाम करून दम्यावर त्वरित उपयुक्त ठरतात.
जागतिक दमा दिवस
मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक दमा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. या वर्षी 7 मे हा जागतिक दमा दिवस होता. दमा म्हणजे ब्राँकियल अस्थमा. दमा हा श्वासनलिकांचा एक विकार आहे, ज्यामध्ये फुफ्फुसांतील श्वासनलिका या काही काळासाठी आकुंचन पावतात. त्यामुळे अशा रुग्णाला श्वास आत घ्यायला आणि बाहेर सोडायला त्रास होतो. या अवस्थेला दमा असे म्हणतात. कारण या अवस्थेत या व्यक्तीला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कमी पडतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा दमा झाला आहे, असे समजते तेव्हा ती व्यक्ती घाबरून जाते. गांगरून जाते. ‘आता माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही’ असं काही जणांना वाटतं. वाचकहो, दमा ही एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेवर आपण मात करू शकतो.
दम्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक एक्स्ट्रिंझिक म्हणजे बाह्य कारणांमुळे उद्भवणारा दमा आणि दुसरा इंट्रिन्झिक म्हणजे आंतरिक दमा. धूळ, धूर, परागकण, उग्र वास जसे की, उदबत्तीचा धूर, डास पळवणार्‍या अगरबत्त्या – मॅटस् , परफ्युम्स, डिओडरंटस्, कुत्रा- मांजर यासारखे पाळीव प्राणी, काही विशिष्ट खाद्यपदार्थ, अस्पिरिनसारखी काही औषधे, रंगांचा उग्र वास यांच्या सान्निध्यात आल्यानंतर दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. याला अ‍ॅलर्जिक अस्थमा असेही म्हणतात. एखादा पदार्थ सहन न होणे म्हणजे अ‍ॅलर्जी. या प्रकारामध्ये अनुवंशिकता असते, म्हणजे आई किंवा वडील यांना दमा असेल, तर मुलांना होऊ शकतो. पण, तो होईलच असं नाही. हा दमा लवकरच्या वयात म्हणजे अगदी लहान वयात उद्भवतो. अशा प्रकारची अ‍ॅलर्जी त्वचेला असू शकते. अशा व्यक्तीला सर्दी असू शकते, डोळ्यांमध्ये खाज होऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात. इंट्रिन्झिक प्रकारचा दमा हा बाह्यकारणामुळे उद्भवत नाही, तर तो आतल्या कारणांमुळे उद्भवतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये तशी ती अवस्था असते किंवा तो फॅक्टर असतो आणि मग अशा व्यक्तीला काही रसायनांमुळे त्रास होतो, हवेतल्या प्रदूषणामुळे त्रास होतो.
दम्यासारखा दुसरा आजार सीओपीडी
हवेच्या प्रदूषणामध्ये ओझोन वायू असतो, त्याचा त्रास होतो. श्वासनलिकेमध्ये जेव्हा कांही विषाणूमुळे, जसे की रेस्पिरेटरी सिन्सिटिएल व्हायरस किंवा पॅराएन्फ्लुएंजा अशा प्रकाराच्या विषाणूंमुळे संसर्ग होतो आणि मग दम्याचा त्रास उद्भवू शकतो. छाती घरघरणे, दम लागणे, धाप लागणे, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, श्वास कोंडल्यासारखे वाटणे, कोरडा खोकला येणे, विशेषत: रात्रीच्या वेळी खोकला येणे, ही दम्याची मुख्य लक्षणे असतात. दम्याचा त्रास आहे, अशी शंका आली तर, तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांमध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची साधी फुंक मारून संगणकाद्वारे चाचणी केली जाते. त्यावरून एखाद्या व्यक्तीला दमा आहे की नाही किंवा दम्यासारखा दुसरा आजार ज्याला सीओपीडी म्हणजे Chronic Obstructive Pulmonary Disease म्हणतात, तो आहे की नाही हे कळते. बर्‍याचदा वरवर तपासणी करून किंवा साधा एक्स-रे काढून तो दमा आहे की, सीओपीडी हे समजत नाही. यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणे गरजेचे असते. डीएलसीओ नावाची एक आधुनिक तपासणी फुफ्फुसांसाठी आणि शासनलिकांसाठी महत्त्वाची असते.
डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग लंग कपॅसिटी ऑफ कार्बन मोनॉक्साईड. या चाचणीद्वारे दमा आणि सीओपीडी यातला फरक समजतो. याशिवाय आईएलडी म्हणजे इंटरस्टिशिअल लंग डिसीज या गंभीर आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान होते. वाचकहो दम्यावर तुम्ही मात करू शकता. दम्यासाठी जी उपचार पद्धती आहे, त्यामध्ये तोंडाद्वारे घ्यायची औषधे जशी आहेत, तशीच श्वासावाटे घ्यायची औषधे असतात. ही औषधे अत्यंत उपयुक्त असतात. डोळ्यांच्या आजारासाठी आपण जसे डोळ्यात थेंब टाकतो, त्वचेच्या विकारासाठी आपण त्वचेवर मलम लावतो, त्याच पद्धतीने श्वसन मार्गात सोडण्यासाठी जी औषधे पंपावाटे म्हणजे इन्हेलरद्वारे, रोटाहेलरद्वारे दिली जातात ती श्वासनलिकांवर परिणाम करून दम्यावर त्वरित उपयुक्त ठरतात. या औषधांचे फारसे साईड इफेक्ट नसतात. बरेच जण इन्हेलर घ्यायला घाबरतात. तसे घाबरून जाऊ नये. इन्हेलर किंवा रोटायलर यांची सवय लागत नाही.
काही व्यक्ती दम्याला घाबरून जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे देशी उपचार घेतात, बुवा बाबांकडे जातात. काही लोक पौर्णिमेला ताटामध्ये चंद्राचं दर्शन घ्यायला किंवा मासा गिळायला जातात, तर हे सगळे प्रकार अंधश्रद्धेचे आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकाराचा अशास्त्रीय उपचार घेऊ नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या. तुम्ही दम्यावर मात करू शकता. मानसिक ताणतणाव हे दम्याचे प्रमुख कारण आहे , हे विसरू नका. घरात जर कुत्रा, मांजर वगैरे पाळीव प्राणी किंवा पक्षी पाळत असाल, तर त्याचाही त्रास होऊ शकतो. खाण्याचे काही विशिष्ट पदार्थ असतात ते पदार्थ आपण टाळायला हवेत. विशेषत: बाहेरचे खाणे हे दमेकर्‍यांनी टाळायला हवे. दमा हा अत्यंत सहजपणे आटोक्यात येऊ शकतो. काही जण नको-नको ती पथ्ये करत असतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेली पथ्येच आपण करावीत.
जागतिक दमा दिनानिमित्त ‘GIN-’ म्हणजे ग्लोबल इनिशिएटिव्ह फोर अस्थमा, या डब्ल्यूएचओशी संलग्न असलेल्या संस्थेकडून एक घोषवाक्य दिले जाते. अर्थात ही संस्था दम्यावरील उपचारासाठी जगभरातल्या डॉक्टरांना मार्गदर्शक सूत्रे घालून देत असते. यावर्षीचे घोषवाक्य आहे.. ‘अस्थमा एज्युकेशन एमपॉवर्स’ म्हणजे ‘दम्याविषयीचे आरोग्य शिक्षण हे रुग्णांना सक्षम बनवते’.  दम्याविषयी जाणून घ्या, दम्याला मित्र समजा आणि तो मित्र एकदा समजून घेतला तर दम्याची भीती वाटत नाही, याउलट दम्यावर तुम्ही सहजपणे मात करू शकता.
हेही वाचा 

Benefits OF Amla and Honey : आरोग्यासाठी गुणकारी आहे आवळा व मध
Gut Health : आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ ठरते महत्त्वाचे…
Coconut cream : शहाळ्याची मलईही असते आरोग्यदायी