प्रयोगशाळेत बनणार कुणालाही चालणारे रक्त

प्रयोगशाळेत बनणार कुणालाही चालणारे रक्त

वॉशिंग्टन : पोटातील जीवाणूंचा वापर करून संशोधक सध्या ‘युनिव्हर्सल डोनर ब्लड’ म्हणजेच कुणालाही चालू शकणारे रक्त बनवत आहेत. हे रक्त बनवण्याच्या कार्यात ते केवळ एकच पाऊल दूर आहेत. असे रक्त तयार झाल्यावर ते कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला देता येऊ शकेल.
सध्या ‘ओ’ रक्तगटाचे लोक ‘युनिव्हर्सल डोनर’ किंवा ‘वैश्विक दाते’ म्हणून ओळखले जातात. मात्र, जगभरात सध्या अशा रक्ताची कमतरताच भासते. त्याला पर्याय म्हणून प्रयोगशाळेत असे कुणालाही देता येण्यासारखे रक्त बनवले जात आहे. अर्थात, हे रक्त दवाखान्यांपर्यंत पोहोचण्याआधी त्यावर बरीच कामे होतील.
याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर मायक्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी शुगर मॉलेक्युल्स म्हणजेच शर्करेच्या रेणूचे लांब धागे शोधले आहेत. त्यांनी पोटातील बॅक्टेरिया एन्झाईम्सच्या कॉकटेलचा वापर करून लाल रक्तपेशींपासून असे लांब शुगर मॉलेक्युल्स तयार केले. स्वीडनमधील लुंड युनिव्हर्सिटीच्या डॉ. मार्टिन ऑल्सन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, कृत्रिम एन्झाईम्स तयार करण्याऐवजी आम्ही हा मार्ग स्वीकारला.
लाल रक्तपेशींचा पृष्ठभाग कसा असतो, हे आम्ही पाहिले. आपल्या पोटातील म्युकसही तसाच असतो. त्यामुळे आम्ही केवळ तेथील जीवाणूंपासून एन्झाईम्स घेतले आणि ते लाल रक्तपेशींवर लावले. ‘ओ’ रक्तगटाच्या रक्तात प्रतिकार शक्तीचा विरोध होणारी शुगर मॉलेक्युल्स किंवा अँटिजेन्स नसतात. त्यामुळे तिचा स्वीकार प्रत्येक शरीर करते. अर्थात, कोणत्याही रक्तगटाच्या माणसाला ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाचे रक्त चालते. तसाच प्रकार या प्रयोगशाळेतील रक्ताबाबत आहे.