नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नाशिक-दिंडोरी मतदारसंघासाठी येणारा बुधवार (दि. १५) प्रचारयुद्धाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिन्ही दिग्गजांच्या प्रचारतोफा बुधवारी एकाच दिवशी धडाडणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील वातावरण खऱ्या अर्थाने निवडणूकमय होणार आहे.
नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा ११ मे रोजी थंडावल्यानंतर दिग्गज नेत्यांचे नाशिकमध्ये प्रचारदौरे सुरू होणार आहेत. या नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलींचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले जात आहे. भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे नियोजन झाले आहे. सुरुवातीला मोदींच्या सभेसाठी १० मे रोजीचा मुहूर्त निश्चित केला होता; परंतु या दिवशी अक्षय्य तृतीया असल्याने सभेच्या गर्दीवर होणारा परिणाम लक्षात घेत मोदींच्या सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली. ही सभा आता येत्या बुधवारी (दि. १५) रोजी होणार आहे. सभेकरिता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेची निश्चिती करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहतील. भाजपकडून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पंकजा मुंडे यांच्याही स्वतंत्र सभा नाशिकमध्ये होणार त्या दृष्टीनेदेखील महायुतीकडून तयारी सुरू आहे. मोदींच्या सभेच्या दिवशीच (दि. १५) राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन सभा दिंडोरी मतदारसंघात होणार आहेत. वणी व निफाड येथे या सभा होतील. याच दिवशी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे. त्यामुळे येणारा बुधवार प्रचार सभांचा ठरणार आहे. या सभांना होणारी गर्दी, नेतेमंडळी काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:

राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी तयार
उमेदवारांचा जरा हटके प्रचार : सुटीचा रविवार लक्षात घेऊन मतदारांना घालतोय साद
मायस्थेनिया : एक धोकादायक आजार