नाशिकमध्ये वळवाची हजेरी, दोन दिवस इशारा

नाशिकमध्ये वळवाची हजेरी, दोन दिवस इशारा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिकम‌ध्ये शुक्रवारी (दि.१०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात पाच ते सहा ठिकाणी वृक्ष कोसळले. परिणामी, बत्तीगूल झाली होती. सिन्नर व कळवण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तर चांदवडला वीज कोसळून गाय दगावली.
राज्याच्या विविध भागांत दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या अवकाळीने नाशिकमध्ये हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी ३ ला अचानक जोरदार वारे सुटले. तसेच आकाशात काळे ढगदेखील दाटून आले. अंबड, सिडको, पाथर्डी फाटा आदी भागांत सायं. ४ च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही भागांत वृक्ष उन्मळून पडले. तर सिडकोतील पीरबाबा चौकात पिंपळाचे झाड कोसळल्याने मंदिराच्या सभामंडपाचे नुकसान झाले. पावसाच्या आगमनामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी बत्तीगूल झाली. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. शहरात सायंकाळी ५.३० पर्यंत १.४ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. चांदवडमध्ये पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कानमांडळे गावात १० ते १२ घरांचे अंशत: नुकसान झाले. तर कळवण तालुक्यातही पावसाचा जोर अधिक होता. सिन्नर शहर व परिसराला अवकाळीने दणका दिला. बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती आहे. कांदा, भाजीपाला, टोमॅटोसह अन्य पिकांना धोका निर्माण होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दोन दिवस इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात जळगाव वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावेल. यावेळी ४० ते ५० किमी प्रतिवेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज आहे.
 हेही वाचा –

मोह मोह के धागे
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा उद्धव, शरद पवार यांनी आमच्यासोबत यावे : मोदी