रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकरांची आघाडी !

रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकरांची आघाडी !

राजेंद्र उट्टलवार

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कडक उन्हाचा तडाखा बसत असताना विविध कारणांनी सध्या नागपुरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर, महावितरणला द्यायची या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील लावल्या गेलेल्या एकूण 1 लाख 40 हजार 808 सोलर रुफ टॉपपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात 24 हजार 357 ग्राहकांनी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विदर्भाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवून पर्यावरणपूरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत केली आहे.
रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल दोन हजार 53 मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील 24 हजार 357 रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता 251 मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉपच्या तुलनेत 17.29 टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहेत हे विशेष. नागपुर परिमंडलाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 रुफ टॉप ग्राहकांसह परिमंडलातील एकूण 27 हजार 10 ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली असून राज्यातिल एकूण सोलर रुफ़ टॉप मध्ये नागपूर परिमंडलाचा वाटा 19.18 टक्के आहे.
आकडेवारीनुसार सात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ 1 हजार 74 ग्राहकांकडून 20 मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी झाली आहे, गतवर्षी ही संख्या 76 हजार 808 इतकी होती. यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता एक हजार 860 मेगावॉट होती, एकट्या नागपूर जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 10 हजार 94 ग्राहकांनी 82 मेगावॅट स्थापित वीज निर्मिती करणा-या रुफ़ टॉफ संचाची स्थापना केली आहे.
सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाचा नेहमीपेक्षा कमी वीज वापर होतो, त्यामुळे वीजबिलात देखील कपात होते. याशिवाय ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पुढील 25 वर्षे होत राहतो.
कशी कराल नोंदणी
https://pmsuryaghar.gov.in/discom/solar/account/subDivisionList या संकेतस्थळावर किंवा पीएम – सूर्यघर मोबाईल ॲपवर नोंदणी केल्यानंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या संकेतस्थळावर जाऊन ही प्रकिया पुर्ण करायची आहे. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते. ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. या योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.