कोल्हापूर: साळवाडीत बिबट्याने रेडकू पळविले
कळे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून मानवी वस्तीमध्ये आलेल्या बिबट्याने सोमवारी (दि. १५) पहाटे साळवाडी (ता.पन्हाळा) येथील घरासमोर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातील म्हैशीचे रेडकू पळविल्याची घटना घडली. यामुळे परिसरात पुन्हा भीतीदायक वातावरण पसरले असून वन विभागाने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी होऊ लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी बिबट्याने कुंभारवाडी येथील गोठ्यातून गायीचे वासरु पळविले होते. पहाटेच्या सुमारास साळवाडी येथील संभाजी गणपती घाटबांदे यांच्या घरासमोरील खुल्या गोठ्यातील म्हैशीचे रेडकू पळविले. सकाळी तेथून जवळच असलेल्या गवताच्या वाफ्यामध्ये रेडकाच्या शरीराचे अवशेष आढळून आले. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल एन.एस.पाटील, वनरक्षक एस.व्ही.काशिद, वनमजूर निवृत्ती चौधरी, राजन भंडारी यांनी घटनास्थळी भेट देवून सरपंच, पोलिसपाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जनावराच्या मृत शरीराचा पंचनामा केला.
सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने साळवाडी येथील पाळीव जनावरावर हल्ला केल्याची बातमी परिसरात सोशल मीडियाद्वारे पसरली. यामुळे साळवाडीसह वारनूळ, कुंभारवाडी, काटेभोगाव, वाळवेकरवाडी, माजनाळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून शोध मोहीम गतिमान केली आहे.
दरम्यान, पन्हाळा वन परिक्षेत्र कार्यालयाची रेस्क्यु टीम, कळे बीट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुंभारवाडी येथील शिवारात दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. चार ट्रॅप कॅमेरे बसविले होते. सायंकाळी अंधार पडल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेतला. पण कॅमेऱ्यामध्ये बिबट्याच्या हालचाली जाणवल्या नाहीत. वन विभागाने ठोस उपाययोजना राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा
कोल्हापूर: शिरोळमध्ये ‘केवायसी’ अभावी नागरिकांचे बँकेत हेलपाटे
कोल्हापूर जिल्ह्यात होणार 210 कि.मी.चे काँक्रिट रस्ते
कोल्हापूर : कुंभारवाडीमध्ये सलग दोन रात्री बिबट्याचा मानवी वस्तीत वावर
Latest Marathi News कोल्हापूर: साळवाडीत बिबट्याने रेडकू पळविले Brought to You By : Bharat Live News Media.