कोल्हापूर: बिद्री परिसरात उत्साह; बोरवडे, वाळवे खुर्द येथे शांततेत मतदान

कोल्हापूर: बिद्री परिसरात उत्साह; बोरवडे, वाळवे खुर्द येथे शांततेत मतदान

बिद्री : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीचे बिद्री परिसरात चुरशीने मतदान झाले. यावेळी बोरवडे व वाळवे खुर्द या अतिसंवेदनशील गावात मतदान शांततेत पार पडले. एरव्ही मतदानासाठी स्थानिक नेत्यांत असणारी चढाओढ न होता कार्यकर्त्यांत एकोपा पहावयास मिळाला.
सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली. तत्पूर्वीच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बिद्री येथील १२३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिन मॉकपोल घेताना सुरु न झाल्यामुळे मतदानापूर्वीच मशिन बदलावे लागले. नवीन मशीन आल्यानंतर मतदान सुरळीत झाले. बाहेरगावी व शेतीच्या कामाला जाणाऱ्या नागरिकांनी लवकर मतदान करणे पसंत केले. सकाळी ११ वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाळवे खुर्द येथे एका केंद्रावर १३३३ मतदान होते. त्यामुळे भर उन्हात दुपारी १ वाजता येथे मोठी रांग लागली होती. त्यामुळे महिला व पुरुष मतदारांना छोट्या व्हराड्यांत एकत्रच सावलीचा आधार घ्यावा लागला. अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रावर दुपारी दिड ते अडीच वाजेपर्यंत मतदारांची वर्दळ कमी होती. भांगलण करणाऱ्या महिलांनी सकाळी ८ ते १२ मजूरी करून मतदानास येणे पसंत केले.
बिद्री, बाचणी, वाळवे खुर्द, बोरवडे, उंदरवाडी, फराकटेवाडी येथे मतदारांचा उत्साह पहावयास मिळाला. दुपारी ४ वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले होते. यावेळी बोरवडे व वाळवे खुर्द या अतिसंवेदनशील गावात मतदान शांततेत पार पडले. एरव्ही निवडणुकीत असणारी मतदानासाठी स्थानिक नेत्यांत असणारी चढाओढ व इर्षा न होता मंडलिक-मुश्रीफ-घाटगे गटाच्या युतीमुळे प्रथमच कार्यकर्त्यांत एकोपा पहावयास मिळाला. मतदान केंद्रास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उमेदवार संजय मंडलिक, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, भूषण पाटील यांनी भेटी देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हेही वाचा 

कोल्हापूर: सैनिक टाकळीत भर उन्हातही चुरशीने ४१ टक्के मतदान
कोल्हापूर: आंबा मतदान केंद्रावर निसर्ग पर्यटन जागवणारी थीम
Kolhapur news | कोल्हापूर परिक्षेत्रात १६ हजारांवर समाजकंटकांवर कारवाईचा बडगा