बाजारात अस्वस्थता! सेन्सेक्स ३८३ अंकांनी घसरून बंद, ३ दिवसांत गुंतवणूकदारांनी गमावले ११ लाख कोटी

बाजारात अस्वस्थता! सेन्सेक्स ३८३ अंकांनी घसरून बंद, ३ दिवसांत गुंतवणूकदारांनी गमावले ११ लाख कोटी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातून मजबूत संकेत असतानाही मंगळवारी (दि.७) भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांक आणि व्यापक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीचे नुकसान झाले. सेन्सेक्स ३८३ अंकांनी घसरून ७३,५११ वर बंद झाला. तर निफ्टी १४० अंकांच्या घसरणीसह २२,३०२ वर स्थिरावला.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने सुमारे १ हजार अंक गमावले आहेत. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ११ लाख कोटींनी कमी झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात होत असलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे निफ्टी अस्थिर बनला आहे. एकूणच निवडणूकपूर्व अस्वस्थता बाजारात दिसून येत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
निफ्टी FMCG निर्देशांक २ टक्के, निफ्टी आयटी ०.७७ टक्क्यांनी वाढला. तर निफ्टी रियल्टी आणि मेटल अनुक्रमे ३.५ टक्के आणि २.३ टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे Nifty PSU Bank २.३ टक्क्यांनी, निफ्टी हेल्थकेअर २ टक्के आणि निफ्टी ऑटो १.८ टक्क्यांनी खाली आला.
निफ्टी मेटल गडगडला
निफ्टी एफएमसीजी वगळता सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. निफ्टी मेटल निर्देशांक विक्रीच्या दबावामुळे २.७ टक्क्यांनी घसरून लाल रंगात बंद झाला. हिंदुस्तान झिंक, नॅशनल ॲल्युमिनियम आणि हिंदाल्को शेअर्समधील घसरणीमुळे निफ्टी मेटल खाली आला. तसेच गुंतवणूकदार कमकुवत बाजारामध्ये काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंगकडे वळल्याने रियल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स घसरले.
निफ्टी बँकमध्येही घसरण
कमकुवत बाजारात निफ्टी बँक निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरला. पीएनबीचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून १२३ रुपयांवर आला. इंडसइंड बँक २.८० टक्के, बंधन बँक २.७० टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक २.५६ टक्के आणि बँक ऑफ बडोद्याचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरला. दरम्यान निफ्टी बँकवर कोटक बँकेचा शेअर्स १ टक्के वाढून १,६४२ रुपयांवर पोहोचला.
कोणते शेअर्स टॉप गेनर्स, टॉप लूजर्स
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक एचसीएल टेक, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस, आयटीसी, विप्रो, इन्फोसिस, कोटक बँक हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टीवर बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, हिंदाल्को, सिप्ला आणि श्रीराम फायनान्स हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस हे शेअर्स सर्वाधिक वाढले.
गोदरेज कन्झ्यूमरचा शेअर्स तेजीत
गोदरेज कन्झ्यूमर प्रॉडक्ट्सचा शेअर्स (Godrej Consumer Products Share Price) आज बीएसईवर ६ टक्क्यांनी वाढून १,३२३ रुपयांवर पोहोचला. या कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत १,८९३ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवल्यानंतरही त्यांचे शेअर्स वधारले. दरम्यान, या कंपनीच्या महसुलात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मॅरिको शेअर्सची उसळी
आज बाजारात घसरण असतानाही एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बीएसईवर मॅरिकोचे शेअर्स (Marico share price) सुमारे १० टक्के वाढून ५८३ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. एफएमसीजी श्रेत्रातील प्रमुख असलेल्या या कंपनीने मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५ टक्के वाढ नोंदवून ३२० कोटी नफा मिळवला आहे. दरम्यान, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, आयटीसी, टाटा कन्झ्यूमर सारख्या दिग्गज FMCG कंपन्यांचा निफ्टीवर टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. या कंपन्यांचे शेअर्स आज ५ टक्क्यांपर्यंत वाढले.