नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नागरिकांना घरबसल्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी तब्बल पाऊण कोटी रुपये मोजून सुरू केलेल्या क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्कासह महापालिकेच्या अन्य महत्त्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, नवीन सर्व्हरवर क्लाऊड डाटा ट्रान्सफरचे काम सुरू असून मंगळवार (दि.७) सकाळपर्यंत ऑनलाइन सेवा सुरळीत होतील, असे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेने कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी तसेच कामकाज गतिमान होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाइन सेवांवर भर दिला आहे. मूलभूत सेवा-सुविधांविषयक असलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अॅपदेखील विकसित करण्यात आले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालिन महापौर सतिश कुलकर्णी यांनी नागरिकांना घरबसल्या महापालिकेच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन सेवांवर भर दिला होता.
दरम्यान, या सेवा विनाव्यत्यय सुरू राहण्यासाठी महापालिकेने क्लाऊड सर्व्हिसेसचा आधार घेतला आहे. याद्वारे संकलित डाटा सुरक्षित ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी महापालिकेने तब्बल पाऊण कोटी रुपये खर्च करत क्लाऊड सर्व्हिसेस पुरविणाऱ्या कंपनीशी करार केला. त्याअंतर्गत महापालिकेच्या ऑनलाइन सेवांचा डाटा नवीन सर्व्हरवर ट्रान्सफर करण्यासाठी संबंधित कंपनीला महापालिकेने शनिवारच्या सुटीच्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत सर्व डाटा ट्रान्सफर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर तांत्रिक अडचणी उद‌्भवल्या. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतू, सोमवारी सायंकाळपर्यंत देखील तांत्रिक अडचणी कायम राहिल्या. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीसह महापालिकेच्या विविध ऑनलाइन सेवा ठप्प झाल्या.
सर्व्हर डाऊनचा या सेवांवर परिणाम
सर्व्हर डाऊन झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्क ऑनलाइन जमा करण्याच्या सुविधेसह नवीन मिळकत नोंदणी, थकबाकी दाखला, झोन दाखला, जाहिरात परवानगी, प्लंबिंग लायसन्स, झाडे कटिंग, जन्म-मृत्यू नोंदणी प्रणाली, विविध परवाने, विविध ना हरकत दाखले, परवानग्या, रुग्णालयांचे नूतनीकरण, नळजोडणी, जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी, मलनिस्सारण कनेक्शन परवानगी, अग्निशमन ना हरकत दाखले आदींसह महापालिकेच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली, नाट्यगृह व फाळके स्मारक ऑनलाईन तिकिट विक्री प्रणाली, पत्र व फाईल मॅनेजमेंट प्रणाली, स्थानिक संस्था कर संकलन प्रणाली तसेच सेवा हमी कायदा अंतर्गत येणाऱ्या विविध ऑनलाईन कार्यप्रणालींतर्गत सेवा विस्कळीत झाल्या.

क्लाऊड डाटा नवीन सर्वरवर अपलोड करण्यासाठी संबंधित कंपनीला शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे सर्व प्रक्रिया करण्यासाठी तीन दिवस लागले. मंगळवारी सकाळपर्यंत सेवा सुरळीत होईल. – नितीन धामणे, संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग.