मुंबई इंडियन्सच्या ‘सूर्या’वरचे ग्रहण कधी सुटणार?

मुंबई इंडियन्सच्या ‘सूर्या’वरचे ग्रहण कधी सुटणार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी येत आहे. संघाचा अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. एमआयला त्याचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात सूर्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
खरेत सूर्या (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे डिसेंबर 2023 पासून क्रिकेटपासून दूर आहे. यंदाच्या आयपीएलमधील सुरुवातीचे तीन सामने देखील तो खेळू शकला नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळले गेले हे तीनही सामने मुंबई इंडियन्सने गमावले. या सामन्यांमध्ये सुर्याची उणीव भासली. पण आता एनसीएने सुर्याला तंदुरुस्त घोषित केले असून तो मुंबईच्या संघात लवकरच सामील होईल असे वृत्त आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव शुक्रवारी (5 एप्रिल) मुंबई इंडियन्समध्ये सामील होऊन सराव सत्रात भाग घेईल. नेट सेशन आणि फिटनेसच्या आधारावर तो 7 एप्रिलला खेळणार की नाही याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल.
जागतिक टी-20 मध्ये अव्वल असणा-या सुर्याने (Suryakumar Yadav) शेवटचे स्पर्धात्मक क्रिकेट डिसेंबर 2023 मध्ये खेळले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या तिसऱ्या सामन्यात त्याने शतक ठोकले होते. पण दुर्दैवाने त्या मालिकेतच सूर्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक होती. नंतर स्पोर्ट्स हर्नियाने तो त्रस्त असल्याचे समोर आले. परिणामी त्याला मैदानात परत येण्यास विलंब झाला आहे. बंगळुरू येथील एनसीएमध्ये दीर्घकाळ फिटनेसवर काम केल्यानंतर त्याला आता तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.
सूर्याच्या पुनरागमनाचा फटका कोणाला बसणार?
सूर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन झाले तर काही भारतीय खेळाडूंना बाहेर बसावे लागेल. यात नमन धीरचे नाव आघाडीवर आहे. सूर्याच्या अनुपस्थितीत नमनने चांगली कामगिरी केली आहे, पण वरिष्ठ खेळाडूसाठी जागा करण्यासाठी त्यालाच बाहेर बसावे लागेल. सूर्याच्या आगमनाने एमआयच्या संघाचे संतुलनही चांगले राहील. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर तिलक वर्माला क्रमांक-3वर संधी मिळेल.
Latest Marathi News मुंबई इंडियन्सच्या ‘सूर्या’वरचे ग्रहण कधी सुटणार? Brought to You By : Bharat Live News Media.