उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

लासलगाव (जि.नाशिक): Bharat Live News Media वृत्तसेवा
तब्बल २० कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीदेखील दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटणे, कधी वीजपुरवठा खंडित होणे, या कारणामुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगावकराना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिन्यातून फक्त तीन ते चार वेळेसच गावाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. २० कोटी रुपये खर्चाच्या नवीन जलवाहिनीचे सहा महिन्यांपूर्वीच मोठ्या दिमाखात लोकार्पण झाले. तेव्हा सुरळीत पाणीपुरवठा होत राहील ही अपेक्षा फोल ठरली आहे. पुन्हा नवीन आणि जुनी जलवाहिनी फुटल्याने गावाचे पाणी तुटले आहे.
वारंवार जलवाहिनी फुटणे आणि गळती यामुळे लासलगाव परिसरातील महिलांच्या डोक्यावर हंडे आणि धावणारे पाणी टँकर काही थांबण्याची नावे घेत नाहीत. नागरिकांकडून कूपनलिका घेण्याकडे कल वाढला आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरवासीयांना पाण्यासाठी १० ते १२ दिवस आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. नवीन जलवाहिनी अवघ्या सहा महिन्यांतच फुटल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहराला भेडसावणारी पाणीटंचाई मानवनिर्मित असून, त्यास भ्रष्टाचार व कामचुकारपणाचे ग्रहण लागले आहे. १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेले पैसे नेमके कोणाच्या घशात जात आहेत, याचा खऱ्या अर्थाने शोध लावला पाहिजे. योजनेची दुरुस्ती होत असताना निकषात ठरल्याप्रमाणे पाइपची संख्या, पाइपचा दर्जा इत्यादी कामे होत आहे का याची तटस्थ यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. – सचिन होळकर, सरचिटणीस, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी.
हेही वाचा:

काळजी घ्या ! विषाणू वाढीसाठी पोषक वातावरण; उन्हाळ्यामध्ये खोकला, डोकेदुखीचा ’ताप’
काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर
Jalgaon Crime | बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीला तीन तासात अटक

Latest Marathi News उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी Brought to You By : Bharat Live News Media.