बी हेवी मळीचा साठा शिल्लक; सर्वाधिक साठे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात

बी हेवी मळीचा साठा शिल्लक; सर्वाधिक साठे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे देशात बी हेवी मळीचा सुमारे आठ लाख टन साठा पडून आहे. त्यामुळे मळीचे दरही टनामागे दीड ते दोन हजार रुपयांनी घटून 10 हजार 400 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर, साखर कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पात शिल्लक मळीच्या साठ्याची किंमत आठशे कोटी रुपये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ इथेनॉल उत्पादनास परवानगी देऊन साखर उद्योगास मदतीचा हातभार लावण्याची मागणी साखर वर्तुळातून जोर धरत आहे.
देशात सुरुवातीच्या अंदाजापेक्षा अतिरिक्त उत्पादित होणार्‍या साखरेचा विचार करता, तसेच हंगाम सुरुवातीची शिल्लक साखर आणि साखर निर्यातीवरील बंदी लक्षात घेता किमान 15 ते 18 लाख टन अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो. तसेच, बी हेवी शिल्लक मळी साठ्यातून केंद्राने परवानगी दिल्यास देशात सुमारे 170 कोटी लिटरइतके इथेनॉलचे उत्पादन वाढण्यास मदत होण्याची अपेक्षाही साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
कारण पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्र सरकारने निश्चित केलेले असून, त्याच्या लक्षपूर्तीसाठीही निर्णय झाल्यास फायदाच होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष लागल्याची माहिती साखर उद्योगातून देण्यात आली. दरम्यान, मळीचे सर्वाधिक साठे महाराष्ट्र आणि कर्नाटकात पडून आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण तुलनेने कमी असल्याची माहितीही साखर उद्योगातील सूत्रांकडून मिळाली.
देशात गतवर्षी 330.90 लाख टन साखर उत्पादन हाती आले होते. यंदा हेच उत्पादन चालू वर्षी 2023-24 मध्ये मार्चअखेर 300 लाख टन तयार झालेले असून, हंगामअखेर अंतिम उत्पादन 318 लाख टन होऊ शकते. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा 13 लाख टनांनी उत्पादन कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त 17 लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यात आलेली आहे. सध्या देशात 107 लाख टनाइतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार करीत महाराष्ट्र अग्रस्थानी असून, 97 लाख टन उत्पादन घेत उत्तर प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर आहे.
– प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली.

हेही वाचा

कोल्हापूर : नियोजनात अडकला नद्यांतील गाळ
परीक्षा एका दिवसावर, सरकारी शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांची वानवा !
कोल्हापूर : वर्षभरात जिल्ह्यात २६ गावांमध्ये साथ

Latest Marathi News बी हेवी मळीचा साठा शिल्लक; सर्वाधिक साठे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात Brought to You By : Bharat Live News Media.