अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याबाबतच्या आदेशाचे पालन नाही! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याबाबतच्या आदेशाचे पालन नाही! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुन्हा एकदा अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात ओढले. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे’ अशा आशयाचा विशिष्ट मजकुर त्यासोबत प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. हे निर्देश अजित पवार गटाने पाळले नाही, असे म्हणत शरद पवार गटाने त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.

यानंतर न्यायालयाने अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांना तुम्ही आतापर्यंत किती जाहिराती दिल्या आहेत, तिथे चिन्हसोबत काय लिहिले आहे या संदर्भातली विचारणा करत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे तुम्हाला पालन करावे लागेल, अशा सूचना दिल्या.

यावर सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, आम्हीही सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. त्यात आम्ही विनंती केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीमध्ये अजित पवार गटाला दिलेल्या निर्देशातील शेवटची ओळ काढून टाकावी. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. एकदा प्रक्रिया सुरू झाली असताना त्यात आता बदल करण्यासाठी तुम्ही विनंती कशी करू शकता? त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारणा केली की तुम्ही आतापर्यंत किती जाहिराती दिल्या आहेत आणि त्या जाहिरातींमध्ये नक्की काय मजकूर आहे या संदर्भातला तपशील सर्वोच्च न्यायालयाला कळवावा, अशा सुचना दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही बाजूंचे हे अर्ज सविस्तर ऐकणार असल्याचे सांगितले.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या अर्जानुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे सर्वोच्च न्यायालय सविस्तरपणे येत्या शुक्रवारी किंवा लवकरात लवकर ऐकुन घेऊ शकेल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

Latest Marathi News अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याबाबतच्या आदेशाचे पालन नाही! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका Brought to You By : Bharat Live News Media.