ढुम्या डोंगरावरील मोरांची अन्नासाठी धावाधाव

ढुम्या डोंगरावरील मोरांची अन्नासाठी धावाधाव

भामा आसखेड : Bharat Live News Media वृत्तसेवा : चांडोली, वडगाव पाटोळे व शिरोली (ता. खेड) गावच्या सीमेवरील ढुम्या डोंगर परिसरात अनेक ठिकाणी मोरांचे थवे आहेत. डोंगराचा खालचा भाग हा खासगी जमीनदाराचा असल्याने त्यांनी त्यांच्या डोंगराच्या जमीन भागाला नुकतीच आग लावली. या भडकलेल्या आगीचा वणवा वन विभागाच्या हद्दीतील डोंगराला देखील बसला. यामुळे डोंगर परिसरातील खाद्य जळाल्याने मोरांचे थवे अन्नासाठी इकडून तिकडे फिरताना दिसत आहेत.
चांडोली-वडगाव पाटोळे व शिरोली या तीन गावांच्या सीमेलगत ढुम्या डोंगर असून, डोंगराच्या माथ्यावरील जमीन क्षेत्र वन विभागाचे असून, काही थोडेफार क्षेत्र खासगी जमीनदाराचे आहे. डोंगर परिसरात मोर व लांडोर यांचे अनेक थवे वास्तव्यास आहेत. मोरांचे खाद्य म्हणजे जमिनीवरील किडे, कीटक तसेच सरपटणारे छोटे प्राणी तसेच शेतातील पीक आहे. उन्हाळा असल्याने जमीनदाराने आपल्या जमीन क्षेत्राला आग लावली.यामध्ये किडे, कीटक व सरपटणारे लहान प्राणी होरपळून मृत्युमुखी पडले. मोरांचे हक्काचे नैसर्गिक अन्न यामध्ये नष्ट झाले. डोंगराला लावलेल्या वणव्यामुळे मोरांचे थवे इकडून तिकडे पळताना दिसत आहे.
डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी येथून काही लोक नित्यनियमाने जातात. त्यांचा ढुम्या ग्रुप आहे. ग्रुपमधील काही सदस्य अनेक वर्षांपासून डोंगर परिसरात जिथे मोर असतात, त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी गहू, तांदूळ टाकतात. पाण्याची देखील सोय केली आहे. डोंगर परिसरात मोरांना खाद्य म्हणून गहू, तांदूळ टाकण्याचे कार्य निवृत्त पोलिस सोपान राक्षे, सुधाकर जाधव व अन्य लोक करीत असून, पाण्याची देखील सोय केली. परंतु, वणव्यात नैसर्गिक अन्न नष्ट झाल्याने मोरांचे थवे आता डोंगराच्या पायथ्याशी जमिनीतील पिकात शिरून अन्नाची शोधाशोध करीत आहेत.
अनेक झाडांची विनापरवाना कत्तल
राजगुरुनगर वन विभागाच्या कर्मचार्‍यांचे लक्ष नसल्याने डोंगर परिसरातील अनेक लहान-मोठी झाडांची विनापरवाना कत्तल झाली. जमीनदाराने लावलेली आग वन विभाग क्षेत्रात आल्याने लहान झाडे जळाली. कोणकोणती किती झाडे कोणी तोडली, याची माहिती देखील अद्याप वन विभागाच्या कर्मचार्‍यांना नाही, हे विशेष. डोंगराला आग नेमकी कशामुळे लागली? याची चौकशी करण्याची गरज आहे.
हेही वाचा

सावरगाव येथील बंधारा कोरडाठाक; पिके करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त
ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला; कारखान्याचे तोडणीचे नियोजन कोलमडले
आयपीएस अधिकार्‍यांच्या घरी पोलीस शिपाई घरगडी

Latest Marathi News ढुम्या डोंगरावरील मोरांची अन्नासाठी धावाधाव Brought to You By : Bharat Live News Media.