उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार कोसळली : सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव

उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार कोसळली : सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव

धायरी/पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक येथील फन टाइम चित्रपटगृहासमोर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कार कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, या ठिकाणी वाहनचालक व नागरिकांच्या सुक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सिंहगड रस्त्यावरून धायरीकडून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार फन टाइम चित्रपटगृहासमोर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोसळून उलटी. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने चालक बचावला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दयानंद गायकवाड, अशोक कदम, राहुल बांडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून चालकाला सुखरून बाहेर काढले आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, या अपघातामुळे सिंहगड रस्त्यावर वडगाव उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी काही वेळात वाहतूक सुरळीत केली. क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात कोसळलेली कार बाहेर काढली.
फन टाइम चित्रपटगृह ते राजाराम पुलापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु, हे काम करताना नागरिक व वाहनचालकांच्या सुक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच, कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत नसल्यामुळे वारंवार वाहातूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा

काँग्रेसचे रायबरेलीसाठी भूपेश बघेल, अमेठीसाठी अशोक गेहलोत पक्ष निरीक्षक
भैरोबानाल्यातून वाहतेय कत्तलखान्याचे पाणी! दुर्गंधीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त
Azim Premji : अजिम प्रेमजी आता बँकिंग क्षेत्रात उतरणार?