हातकणंगलेत चौरंगी लढत, सत्यजित पाटील- सरुडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी

हातकणंगलेत चौरंगी लढत, सत्यजित पाटील- सरुडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी

Bharat Live News Media ऑनलाईन : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आज बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. हातकणंगलेतून सत्यजित पाटील -सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. आज करण पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते आता मशाल चिन्हावर जळगावमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरेंच्या शिवसेनेने कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे.
हातकणंगलेत चौरंगी लढत
दरम्यान, हातकणंगलेतून धैर्यशील माने शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. या आधी खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी अशी दुरंगी लढतीची चर्चा मतदारसंघात असतानाच आता ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा उमेदवार उतरवला आहे. यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने येथून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे.
हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेकडे आहे. येथून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, असा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. मात्र राज्यातील नेत्यांनी राजू शेट्टी हे शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असतील तरच त्यांना पाठिंबा द्यावा; अन्यथा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करावा, अशी भूमिका मांडली. दरम्यान, शेट्टी यांनी दोनवेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिल्याने तेथून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला आहे.
हे ही वाचा :

शिंदेंना धक्का; ‘स्टार प्रचारक’ यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश
ठाकरेंची मोठी खेळी! उन्मेष पाटील यांच्या हाती बांधले शिवबंधन
शिंदेंना धक्का; ‘स्टार प्रचारक’ यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश

 
Latest Marathi News हातकणंगलेत चौरंगी लढत, सत्यजित पाटील- सरुडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी Brought to You By : Bharat Live News Media.