एमआयएम लढवणार सोलापूर लोकसभा; रमेश कदम यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न

एमआयएम लढवणार सोलापूर लोकसभा; रमेश कदम यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न

मुंबई ः Bharat Live News Media वृत्तसेवा ;  सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात आपला उमेदवार उतरवण्याच्या हालचाली एमआयएमने चालवल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासमोर उमेदवारीचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे.
संबंधित बातम्या 

लायगुडे दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट : दोन संस्थांच्या निविदा ठरल्या पात्र
एकनाथ शिंदेंना धक्का; ‘स्टार प्रचारक’ यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळण्याचे आदेश
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराणा निवडणूक आयोगाचे यूथ आयकॉन

एमआयएमच्या सोलापूर जिल्हा पदाधिकार्‍यांनी आठ नगरसेवकांसह रमेश कदम यांची भेट घेऊन सोलापूर लोकसभा एमआयएमच्या तिकिटावर लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी रमेश कदम यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे.
सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत आधीच जाहीर झाली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे निकाल फिरवण्याइतके वर्चस्व मानले जाते. मात्र वंचितने अद्याप इथे उमेदवार दिलेला नाही. आता एमआयएमची उमेदवारी रमेश कदम यांनी स्वीकारल्यास ही लढत तिरंगी होऊ शकेल असे जाणकारांना वाटते.
रमेश कदम हे मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. मात्र अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कथित घोटाळ्यात त्यांची ही पूर्ण टर्म कारावासातच गेली. तरीही मोहोळ मतदारसंघात त्यांचे आजही वर्चस्व ते राखून आहेत. सोलापूर जिल्ह्यात मुस्लिम मतांचे प्रमाण साधारण 10.22 टक्के असून अनुसूचित जातींंची लोकसंख्या 15 टक्के आहे. बुध्दिस्ट लोकसंख्या 0.83 टक्के असल्याचे 2019 ची आकडेवारी सांगते. या तीन समाजघटकांच्या जोरावर एमआयएमने रमेश कदम यांच्या उमेदवारीवर डाव खेळण्याचे ठरवलेले दिसते. रमेश कदम एमआयएमची उमेदवारी स्वीकारतात का, यावर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पुढची समीकरणे अवलंबून आहेत.
Latest Marathi News एमआयएम लढवणार सोलापूर लोकसभा; रमेश कदम यांना रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.