उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकारणावर बाहुबलींचा प्रचंड पगडा

उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकारणावर बाहुबलींचा प्रचंड पगडा

पूर्वी जनबल आणि बुद्धिबल हा राजकारणाचा पाया होता, कालांतराने या दोन्हींच्या जोडीने राजकारणात धनबलाचीही गरज भासू लागली. आजकाल राजकारणात बहुतांश ठिकाणी या त्रिशक्तीच बाजी मारताना दिसत आहेत. पण उत्तर प्रदेश आणि बिहारचं राजकीय गणितच जरा वेगळं आहे. मागील जवळपास पन्नास वर्षांपासून या दोन राज्यांच्या राजकारणावर बाहुबलींनी मांड ठोकलेली दिसत आहे.
यूपीचे जातीय समीकरण!
उत्तर प्रदेशच्या राजकारणात पूर्वीपासूनच जातीय समीकरणांना फार मोठे महत्त्व आहे. ब्राह्मण, ठाकूर, मुस्लिम, दलित आणि ओबीसी या प्रमुख पाच जातीय घटकांभोवती उत्तर प्रदेशचे राजकारण फिरते. साधारणत: 1970 च्या दशकापासून उत्तर प्रदेशातील जातीय राजकारणाची धार अधिकच धारदार होत गेलेली दिसते आणि या जातीय राजकारणाचा भाग म्हणूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबलींचा बोलबाला होत गेल्याचेही दिसते. त्याचाच भाग म्हणून इथल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पदरी बाहुबलींची फौज बाळगायला सुरुवात केली.
पहिला बाहुबली!
उत्तर प्रदेशच्या राजकारणात अवतरलेला पहिला बाहुबली म्हणजे हरीशंकर तिवारी! ब्राह्मण विरुद्ध ठाकूर अशा वर्चस्वातून हरीशंकर तिवारीचा उदय झाला, तर त्याला पर्याय म्हणून वीरेंद्र प्रताप हा दुसरा बाहुबली मैदानात उतरला आणि कालांतराने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर बाहुबलींनीच मांड ठोकायला सुरुवात केली. कल्याण सिंग, राजनाथ सिंग, मुलायमसिंग यादव, मायावती, अखिलेश यादव असोत की विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, या प्रत्येकांच्या मंत्रिमंडळात किंवा विधानसभेत बाहुबलींचा वरचष्मा हा बघायला मिळतोच. एक काळ तर असा होता, की उत्तर प्रदेशात कुणाचेही सरकार असले तरी हरीशंकर तिवारींचे मंत्रिपद अबाधित असायचे. थोड्याफार फरकाने आजही तशीच अवस्था आहे, म्हणजे कोणी ना कोणी बाहुबली मंत्रिमंडळावर मांड ठोकून बसलेला दिसतोच.
एकापेक्षा एक वरचढ!
मुख्तार अन्सारी, धनंजय सिंग, अतिक अहमद, अशरफ अहमद, फुलनदेवी, राजू पाल, रघुराज प्रतापसिंग ऊर्फ राजाभैय्या, ओमप्रकाश पासवान, ब्रिजभूषण शरणसिंग असे एकापेक्षा एक वरचढ बाहुबली उत्तर प्रदेशच्या राजकारणात होऊन गेलेत आणि आजही आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बलात्कार अशा अनेक कामगिरी या बाहुबलींच्या नावावर उत्तर प्रदेश पोलिसांच्या दप्तरी नोंदविल्या गेल्या; पण त्यामुळे या बाहुबलींच्या राजकारणाला कुठे बाधा आलेली दिसली नाही. उत्तर प्रदेशचे राजकारण आजकाल या बाहुबलींच्याच इशार्‍यावर चालते आणि त्यात बदल संभवत नाही.
बाहुबलींची बिहारी टोळी!
एकेकाळी बिहार म्हणजे ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची कर्मभूमी होती. देशातील सत्ताबदलाचे वारे सर्वप्रथम याच भूमीवरून वाहिले होते. जयप्रकाश नारायण यांच्याच समाजवादी विचारसरणीच्या तालमीत तयार झालेले लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांचाच आजकाल बिहारच्या राजकारणावर वरचष्मा आहे. मात्र, जयप्रकाश यांच्याबरोबरच त्यांच्या विचारधारेचाही बिहारला विसर पडलेला आहे की काय, अशी शंका यावी, इतके बिहारच्या राजकारणाचे अध:पतन झालेले आणि होताना दिसते आहे.
इथले राजकीय समीकरण!
बिहारच्या राजकारणाला भूमिहार विरुद्ध राजपूत आणि जमीनदार विरुद्ध दलित अशा संघर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात याच संघर्षातून बिहारमध्ये नक्षलवादी चळवळींची सुरुवात झाली होती, ती जागा आता बाहुबलींनी व्यापलेली दिसते. आनंद मोहन, मुन्ना शुक्ला, पप्पू यादव, महम्मद शहाबुद्दीन, चंदनसिंग लायन, लड्डुसिंग लायन, शंकरसिंग, टोलासिंग, बुटनसिंग अशी बिहारमधील काही राजकीय बाहुबलींची नावे आहेत. उत्तर प्रदेशातील बाहुबलींप्रमाणेच त्यांचेही कारनामे बहुचर्चित आहेत; पण सर्वच राजकीय पक्षांची आणि त्यांच्या त्यांच्या नेत्यांची राजकीय गरज म्हणून या बाहुबलींना आश्रय दिला जाताना दिसतो.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बाहुबलीआधारित राजकारणाचा प्रभाव हळूहळू देशभरातील अन्य काही राज्यांमध्येही पडताना दिसत आहे. देशभर अनेक राज्यांच्या राजकारणात कोणी ना कोणी बाहुबली सक्रिय होताना दिसतोय. देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही चिंतेची बाब समजायला पाहिजे.
महाविद्यालयांतून होतोय बाहुबलींचा उदय!
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या बहुतांश बाहुबलींना महाविद्यालयीन राजकारणाची पार्श्वभूमी आहे. महाविद्यालयीन पातळीवर राजकीय आणि सामाजिक चळवळी करता करता गुन्हेगारीत पाऊल आणि तिथून थेट राजकारणात एंट्री अशी यापैकी बहुतेकांची वाटचाल दिसून येते. या बाहुबलींचा स्थानिक राजकारणावर इतका प्रभाव आहे, की यातील काही जण तर थेट तुरुंगातूनही निवडून येऊ शकतात.
Latest Marathi News उत्तर प्रदेश-बिहारच्या राजकारणावर बाहुबलींचा प्रचंड पगडा Brought to You By : Bharat Live News Media.