33 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्यातील दोघांना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा

33 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्यातील दोघांना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
धुळे येथील जिल्हा परिषद अपहार कांड प्रकरणात शनिवार (दि.३०) रोजी विशेष न्यायाधीश एफ ए एम ख्वाजा यांनी तत्कालीन रोखपाल भास्कर शंकर वाघ, सहाय्यक लेखाधिकारी सखाराम वसावे या दोघांना वेगवेगळ्या कलमान्वये सात वर्ष सक्त मजुरी तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. आतापर्यंत दाखल गुन्ह्यात दहाव्या खटल्यात ही शिक्षा झाली आहे.
धुळ्याच्या जिल्हा परिषदेत लघु सिंचन विभागात मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची बाब तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम तसेच फसवणूक, अपहार, अपसंपदा असे गुन्हे दाखल करण्यात आले. या खटल्याची व्याप्ती पाहता सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना करून विशेष सरकारी वकील म्हणून संभाजीराव देवकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
गेल्या 33 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचे कामकाजास अखेर शेवट मिळाला असून आता कुठे दहाव्या खटल्याचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील खटला क्रमांक ८/१९९१ मध्ये शनिवार (दि.३०) रोजी विशेष न्यायाधीश एफ ए एम ख्वाजा यांनी आरोपी भास्कर वाघ तसेच सहाय्यक रोखपाल सखाराम वसावे या दोघांना दोषी धरले. या गुन्ह्यामध्ये ३० डिसेंबर १९८८ ते २५ सप्टेंबर १९८९ या कालावधीत २६ आरोपींनी संगनमत करून फौजदारी कट रचून धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्हा परिषदेच्या बचत खात्यामधून लघू सिंचन विभागातील विकासासाठी आलेली रक्कम धनादेशाद्वारे ४७ लाख रुपये स्वतःच्या फायद्याने काढून अपहार केला. त्याचप्रमाणे खोटे हिशोब व बनावट रेकॉर्ड तयार करण्यात आले.
आरोपी सखाराम वसावे यांच्यावर कायद्याने आर्थिक व्यवहार तपासणे, ही जबाबदारी असताना त्यांनी आरोपी भास्कर वाघ यांच्या कटामध्ये सहभागी होऊन चेक बुक, चेक रजिस्टर तसेच अन्य कागदपत्रांची तपासणी केली नाही. या प्रकरणात सर्व २६ आरोपीं विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३/१ सहवाचून दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड संभाजीराव देवकर यांनी पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने आज तत्कालीन रोखपाल भास्कर शंकर वाघ तसेच सहाय्यक लेखाधिकारी सखाराम वसावे यांना दोषी धरीत शिक्षे विषयी मत मांडण्याची संधी दिली. त्यानुसार या दोघा आरोपींनी आपले वय झाले असून न्यायालयाने दया दाखवावी, अशी विनंती आरोपींनी केली. या संदर्भात सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. संभाजीराव देवकर यांनी सदर अपहारित पैसा हा जनतेच्या विकासाच्या कामासाठी आला होता. मात्र तो जनतेच्या विकासासाठी न वापरता अपहार करून शासन आणि जनतेची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे भादवि कलम ७५ नुसार जास्तीची शिक्षा करण्यात यावी अशी विनंती केली.
यानंतर न्यायालयाने वाघ आणि वसावे यांना विविध कलमाअन्वये एक लाख पन्नास हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास विविध आरोपानुसार २८ वर्ष सक्तमजुरी व त्यातील दोन वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर सर्व शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगावे लागणार आहेत. तर या खटल्यातील १७ आरोपी मयत झाले असून ९ आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. यातील दोघांना शिक्षा झाली असून सात जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. विशेषत: हा गुन्हा ३३ वर्षांपूर्वी घडला होता. त्यामुळे या गुन्ह्यातील बरेच साक्षीदार मयत झालेले होते. त्याचप्रमाणे काही गंभीर आजाराने ग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांची साक्ष घेण्यात मोठ्या अडचणी आल्या. जिल्हा परिषद अपहारकांडात आता उर्वरित चार खटले प्रलंबित आहेत. तर केवळ दहा खटल्यांचा निकाल आतापर्यंत लागलेला आहे.
Latest Marathi News 33 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्यातील दोघांना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.