रुग्णांच्या सदस्यत्वाचे ‘ऑटो रिन्यूअल’; या सुविधेचा नेमका फायदा काय?

रुग्णांच्या सदस्यत्वाचे ‘ऑटो रिन्यूअल’; या सुविधेचा नेमका फायदा काय?

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेच्या सभासदत्वाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये योजनेंतर्गत असलेल्या कॅन्सर आणि डायलिलिसच्या रुग्णांना यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सभासदत्वाच्या ’ऑटो रिन्यूअल’ची सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. सभासदांना यंदा नव्याने उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही. सध्या योजनेंतर्गत कॅन्सरचे 1247 आणि डायलिसिसचे 1022 रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरी गरीब योजनेचे 2023-24 मध्ये सभासद असलेल्यांपैकी कॅन्सरचे निदान झालेले आणि डायलिसिस चालू असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णांना सभासदत्वाचे नूतनीकरण करताना केवळ 200 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल आणि त्यांना नवा सभासद क्रमांक दिला जाईल.कॅन्सर अणि डायलिसिच्या रुग्णांना उपचार सुरू असल्याचा पुरावा असलेले प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घेऊन महापालिकेला सादर करायचे आहे. याशिवाय योजना सभासदत्वाचे मूळ कार्डही सादर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कॅन्सर आणि डायलिसिस व्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार घेत असलेले सभासद आणि योजनेत नव्याने सहभागी होणार्‍या सदस्यांना सभासदत्वाची संपूर्ण प्रक्रिया पार पडणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.
नूतनीकरणासाठी असा करा अर्ज
शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेचे सभासद होण्यासाठी  sgy.punecorporation.org या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन फॉर्म आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह कुटुंबातील जबाबदार सभासदाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये नवीन इमारतीतील शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना विभागात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार, योजनेचे सभासद कार्ड रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तयार केलेले असणे अनिवार्य आहे. तसेच, सभासदत्वाच्या दिनांकापासून वैद्यकीय उपचारांच्या बिलाची प्रतिपूर्ती अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेच्या नियमानुसार देय राहील.
हेही वाचा

वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा..
Lok Sabha Election 2024 : पंजाबात भाजपा स्वबळावर
पाण्याची बाटली 20 रुपयांना विकणे भोवले; वाचा काय आहे प्रकरण

Latest Marathi News रुग्णांच्या सदस्यत्वाचे ‘ऑटो रिन्यूअल’; या सुविधेचा नेमका फायदा काय? Brought to You By : Bharat Live News Media.