पाकच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला, 6 चिनी इंजिनिअर्स ठार

पाकच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला, 6 चिनी इंजिनिअर्स ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Pakistan Suicide Bomb Attack : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघाती हल्ला झाला असून या दहशतवादी हल्ल्यात 6 चिनी अभियंत्यांसह एक पाकिस्तानी ड्रायव्हर ठार झाला आहे. चिनी नागरिकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2021 मध्ये बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला होता.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्लामाबादजवळील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दासू येथे आपल्या छावणीकडे जाणाऱ्या चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला एका बॉम्बरने लक्ष्य केले. दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांच्या ताफ्यात घुसवले आणि दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या घटनेतील मृतांचा आकडाही वाढू शकतो. मारले गेलेले चिनी इंजिनिअर पाकिस्तानात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी काम करत होते.
पाकिस्तानात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. यापूर्वी 20 मार्च रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेकडून ग्वादर बंदराला लक्ष्य केले होते. पाकिस्तान चीनच्या मदतीने हे बंदर विकसित करत आहे, ज्याला स्थानिक बलुच लोक विरोध करत आहेत. बीएलएकडून चिनी नागरिकांना अनेकदा लक्ष्य केले जाते.
बलुचिस्तानमधील स्थानिक लोक अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात बंड करत आहेत, परंतु असे असतानाही चीनने येथे मोठी गुंतवणूक केली आहे. चीन पाकिस्तानपासून आपल्या देशापर्यंत एक आर्थिक कॉरिडॉर बनवत आहे, ज्यामध्ये ग्वादर बंदर आणि आसपासचा परिसर विकसित केला जाणार आहे. बलुचिस्तानचा मोठा भाग या CPEC प्रकल्पाचा भाग आहे, ज्याला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून विरोध केला जात आहे.
Latest Marathi News पाकच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला, 6 चिनी इंजिनिअर्स ठार Brought to You By : Bharat Live News Media.