Cyber Crime : डॉक्टरची तब्बल 1 कोटींची सायबर फसवणूक

Cyber Crime : डॉक्टरची तब्बल 1 कोटींची सायबर फसवणूक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिसी कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. परदेशातून पाठविलेल्या कुरिअरच्या पाकिटात अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची बतावणी करून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. तशाच प्रकारे बाणेर भागातील एका डॉक्टरांची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 1 ते 7 मार्च या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली. फिर्यादी डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकीट पाठविले आहे. मुंबई विमानतळावर पाकीट जप्त करण्यात आले आहे. पाकिटात पाच पासपोर्ट, अमली पदार्थ, परदेशी चलन, लॅपटॉप सापडला आहे.
मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असून, त्वरित चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी फिर्यादींकडे केली.
चोरट्यांनी त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी खात्यातून एक कोटी एक लाख 30 हजार रुपये चोरले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी सायबर चोरट्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांनी मोबाइल संपर्क बंद केला होता. पोलिस निरीक्षक अनिल माने पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा

अदानी पोर्ट्सने ३ हजार ८० कोटीला आणखी एक पोर्ट घेतले विकत
मुलीचा हट्ट फळला; सहा वर्षांनंतर विभक्त पती-पत्नी पुन्हा एकत्र
गौर गोपाल दास आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात विविध विषयांवर चर्चा

Latest Marathi News Cyber Crime : डॉक्टरची तब्बल 1 कोटींची सायबर फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.